हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शंभर कोटींच्या कथिक वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीने छापेमारी सुरू केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. जमिनीचे व्यवहारच काढायचे असतील तर ईडी आणि सीबीआयने अयोध्या घोटाळ्याचा तपास करावा असे संजय राऊत यांनी म्हंटल.
ईडी किंवा सीबीआयशी आमचं काही वैयक्तिक वैर नाही. त्या राष्ट्रीय संस्था आहेत. जर देशाचं नुकसान होणारी घटना असेल, मनी लाँड्रिंग असेल तर नक्कीच सीबीआय आणि ईडीने तपास केला पाहिजे. पण आज ज्या प्रकारची प्रकरणं त्यांच्याकडे दिली जात आहेत त्यावरून हे राजकीय वाटत आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला.
भाजपाच्या राज्य कार्यकारिणीत सीबीआयचा ठराव झाला त्याचं आश्चर्य वाटतं. सीबीआय आणि ईडी हे त्यांच्या पक्षाचे सदस्य आहेत असं त्यांना वाटत आहे का? असा सवाल करत जर अशा प्रकारे यंत्रणांचा वापर करून कोणाला महाराष्ट्रात आपलं सरकार येईल असं कोणाला वाटत असेल तर ते अंधारात चाचपडत आहेत असा टोला त्यांनी भाजपला लगावला.