हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. त्यांना दारू धोरणातील घोटाळ्याप्रकरणी आज सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. त्यामुळे आता या चौकशीनंतर ईडी केजरीवाल यांच्यावर काय कारवाई करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्य म्हणजे, ईडीकडून देण्यात आलेली नोटीस बेकायदेशीर आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे केजरीवाल यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
ईडीकडून पाठवण्यात आलेल्या नोटीशीवर प्रतिक्रिया देत अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे की, ईडीने चौकशीसाठी मला पाठवलेली नोटीस बेकायदेशीर आणि राजकीय हेतूने प्रेरित आहे. भाजपच्या सांगण्यावरून ही नोटीस पाठवण्यात आली होती. त्यांनी आपल्यावर करण्यात आलेल्या कारवाई प्रकरणी थेट भाजपला जबाबदार धरले आहे. तसेच, आपल्याला भाजपकडून अडकवले जात असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
दरम्यान, आज अरविंद केजरीवाल यांची चौकशी झाल्यानंतर त्यांना ईडीकडून अटक करण्यात येईल, असा दावा आपच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे. यापूर्वी त्यांची 16 एप्रिलला सीबीआयने चौकशी केली होती. त्यानंतर आज प्रथमच केजरीवाल यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. ईडीने अरविंद केजरीवाल आणि आपच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच, दिल्लीतील दारू धोरण प्रकरणात आरोपी आणि साक्षीदारांच्या जबाबात केजरीवाल यांचे थेट नाव समोर आल्याचे देखील ईडीचे सांगण्यात आले आहे. त्यामुळेच आज केजरीवाल यांची चौकशी करण्यात येत आहे.