हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीची टीम दाखल झाली आहे. पत्राचाळ प्रकरणी ईडी त्यांची चौकशी करण्याची शक्यता असून राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. यापूर्वीच संजय राऊत यांचा दादर येथील फ्लॅट आणि अलिबाग येथील जमीन जप्त केली आहे.
या आधीही पत्राचाळ प्रकरणामध्ये संजय राऊतांना ईडीने चौकशीसाठी बोलावलं होतं. मागील आठवड्यात २ वेळा ईडीने त्यांना समन्स बजावले होते. मात्र संसदेचं अधिवेशन सुरु असल्याचे कारण देत संजय राऊतांनी चौकशीसाठी मुदतवाढ मागवून घेतली होती. मात्र आज अचानक ईडीचं पथक थेट राऊत यांच्या घरी पोहोचल्याने राऊत यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे.
Mumbai | Enforcement Directorate officials at Shiv Sena leader Sanjay Raut's residence, in connection with Patra Chawl land scam case pic.twitter.com/gFYdvR89zU
— ANI (@ANI) July 31, 2022
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमैया यांनी यावरून संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊतांना १२०० कोटींचा पत्राचाळ घोटाळ्याचा हिशोब द्यावाच लागणार. महाविकास आघाडीने सगळीकडे भ्रष्टाचार पसरवला होता. त्यामुळे माफियागिरी करणे, धमक्या देणे दादागिरी करणे याचा हिशोब संजय राऊतांना द्यावाच लागेल अशी टीका सोमय्यांनी केली.
… तरीही शिवसेना सोडणार नाही, मरेन पण शरण जाणार नाही; राऊतांचे ट्विट
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/1DP0i38XBF@HelloMaharashtr @rautsanjay61
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) July 31, 2022
काय आहे पत्राचाळ प्रकरण-
मुंबईतील गोरेगाव येथे सिद्धार्थ नगरमध्ये 672 घरांच्या पुनर्विकासासाठी रहिवाशांनी म्हाडा आणि बिल्डरसोबत करार केला आणि 2008 साली पत्राचाळ पुनर्विकास हा प्रकल्प सुरू झाला. म्हाडा, गुरूआशिष बांधकाम कंपनी आणि रहिवाशांमध्ये या घरांच्या पुनर्विकासासाठी तीन पार्टी करार झाला. 13 एकरपैकी साडेचार एकरवर मूळ रहिवाशांना घरं दिली जातील आणि उर्वरित भागात म्हाडा आणि बिल्डर विक्री करेल असंही ठरलं.मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे. याप्रकरणी गुरुआशिष बांधकाम कंपनीचे माजी संचालक प्रवीण राऊत यांना ईडीने 2 फेब्रुवारी 2022 रोजी अटक केली होती. प्रवीण राऊत शिवसेना नेते संजय राऊतांचे निकटवर्तीय मानले जातात.
पीएमसी बँक घोटाळा प्रकरणांमध्ये प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्या खात्यातुन संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ५५ लाख रुपयांचे कर्ज देण्यात आले होते. यातून त्यांनी दादर येथे फ्लॅट खरेदी केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली होती. ईडीनं जप्त केलेल्या मालमत्तेत प्रवीण राऊत यांचे अलिबागमध्ये आठ भूखंड आणि वर्षा राऊत यांचा फ्लॅटचा समावेश होता.