औरंगाबाद – कोरोना संसर्गाचा ओमिक्रॉन हा घातक विषाणू आढळून आल्यानंतर प्रशासनाने लसीकरणाची गती वाढविण्यासाठी विविध बंधने टाकली आहेत. त्यामुळे नागरिकांचा लसीसाठी प्रतिसाद वाढला आहे. आजघडीला शहरातील 80 टक्के नागरिक लसवंत झाले आहेत. गेल्या महिन्यात मात्र लसीकरणाची टक्केवारी 55 ते 60 एवढीच होती.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी लस नाही तर रेशन, पेट्रोल नाही. सरकारी कार्यालयांत प्रवेश नाही, अशी नियमावली जाहीर केली. त्यामुळे लसीकरणाला प्रतिसाद वाढला. म्हणून मागील 34 दिवसांत मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाले आहे. आजघडीला 80.35 टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर 45.07 टक्के नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले. 8 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर दरम्यान शहरात तीन लाख 57 हजार 885 नागरिकांनी लस घेतली आहे. यात दोन लाख 47 हजार 332 जणांनी पहिला डोस घेतला आहे. एक लाख 16 हजार 556 जणांनी दुसरा डोस पूर्ण केला आहे. आठ लाख 48 हजार 190 जणांनी पहिला डोस घेतला असून चार लाख 75 हजार 776 जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत.
लसीकरणाचे आकडे
एकूण उद्दिष्ट – 10,55,654
पहिला डोस घेतलेल्यांची संख्या – 8,48,190
दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या – 4,75,776
दुसऱ्या डोसची मुदत संपलेल्यांची संख्या – 71,582