एका अजस्त्र यंत्राचं गरगरणं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आडवा छेद | सुहास कुलकर्णी

गेली नऊ वर्षं एक अजस्त्र यंत्र सतत गरगरतंय. त्यात साऱ्या देशाला बसवलं गेलंय. निवडणूक जवळ आली की या यंत्राच्या फिरण्याचा वेग वाढत जातो. त्या यंत्रात फिरणाऱ्या माणसांवर त्याचा परिणाम होतो. निवडणुका पार पडल्या की यंत्र पुन्हा मूळ वेगाने फिरत राहतं. पण ते थांबत नाही. एक दिवस, एक क्षणही थांबत नाही. त्यामुळे माणसं गरगरत राहतात.

भारतीयांना एवढ्या वेगाची सवय नाही. भारतीय लोकांची मूळची घडण संथगती आहे. आपले सण-उत्सव, आपलं संगीत, आपली जीवनशैली मंदगतीची आहे. पाच दिवसीय क्रिकेट हा इंग्रजांचा खेळ. पण तो आपण आपलासा केला, कारण त्याची मंदगती. आपलं राजकारणही संथपणे उलगडणारं. मुळात काँग्रेस पक्ष हा आळशी. त्यामुळे इतकी वर्षं आळोखेपिळोखे देत आपलं राजकारण घडत होतं. पण भाजपच्या नेतृत्वस्थानी नरेंद्र मोदींचा उदय झाला आणि हे सगळं पालटलं.

मोदींनी पंतप्रधान बनल्यानंतर सगळ्या देशाला सर्ववेळ ‘ऑन द टोज’ ठेवलं. ‘मन की बात’मधून ते दर महिन्याला एकदा लोकांशी बोलत राहिले. नव्या योजना, नवे कार्यक्रम, नवे उपक्रम यांचा धडाका त्यांनी लावला. जुन्या योजना-कार्यक्रमांना नवी नावं दिली. स्वच्छ भारत, बेटी पढाओपासून अलीकडच्या अपनी माटी अपना देश सारख्या एक ना अनेक उपक्रमांची सुरुवात त्यांनी केली. सेल्फी काढून पाठवा, योजनांची नावं सुचवा, लोगो स्पर्धेत सहभागी व्हा, ‘मन की बात’साठी विषय आणि माणसं सुचवा असं सांगून लोकांना स्वत:शी जोडून घेतलं.

भाषणं देण्याबाबत तर त्यांचा हात कुणी धरूच शकत नाही. अमुक करणार म्हणून भाषण, अमुक करताना भाषण, तमुक केले म्हणून भाषण… गेली नऊ वर्षं देश मोदींचं बोलणं ऐकतोच आहे. बोलण्याबाबत त्यांची छाती ५६ नव्हे तर १५६ इंचाची आहे, हे त्यांनी केव्हाच सिद्ध करून टाकलं आहे. मोदींचं वक्तृत्व आणि गारुड असं की देशही त्यांचं वर्षांमागून वर्षं ऐकतोच आहे. मनमोहन सिंग आणि सोनिया गांधींच्या ‘मूक’ नेतृत्वाच्या पार्श्वभूमीवर मोदी पुढे आल्याने ऐकण्याची हौस लोकांनी पुरती भागवून घेतलेली दिसतेय.

भारतातील लोक समारंभी वृत्तीचे आहेत हे ओळखून प्रत्येक घटनेचं इव्हेंटमध्ये रूपांतर करण्याचं कौशल्य गेल्या नऊ वर्षांत सत्तापक्षाने दाखवलं आहे. २०१४ मध्ये पहिल्यांदा शपथ घेताना शेजारी देशांच्या प्रमुखांना बोलावण्यापासून त्याची सुरुवात झाली. तिथपासून ते नव्या संसदभवनात ‘सेंगोल’प्रस्थापनेपर्यंत नि परवाच्या समारंभी प्रवेशापर्यंत शेकडो-हजारो इव्हेंट घडवले गेले आहेत. नोंदवायला लागलो तर पुस्तक लिहिलं जाईल नि आठवायला लागलो तर भोवळ येईल एवढे समारंभ पार पाडण्यात आले आहेत. काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या उद्घाटनाचा किंवा अयोध्येतील राममंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आठवून पाहा…त्याच्या प्रसिद्धीचा, जाहिरातींचा, लाइव्ह प्रक्षेपणाचा आणि त्यांच्या बातम्यांचा पसारा आठवा, म्हणजे गेल्या नऊ वर्षांतील अशा घटनांचा आपल्यावर काय इम्पॅक्ट झालाय, हे कळू शकेल.

सर्जिकल स्ट्राइक, ३७० कलम रद्द करणं, नोटबंदी, अचानक लॉकडाऊन अशी अनेक पावलं उचलली गेली आणि ती जनतेच्या गळीही उतरवली गेली. अशा निर्णयांची यादीही मोठी आहे.

मोदींचे सततचे परदेशदौरे, आंतरराष्ट्रीय संमेलनांतील सहभाग, आपल्या देशात आयोजित केलेली संमेलनं, आपल्याकडे आलेले परदेशी प्रमुख, परदेशात जाऊन मूळ भारतीयांसमोर केलेली ‘स्टेडियमी’ भाषणं, परदेशात मिळवलेले पुरस्कार अशा कित्येक गोष्टींचा प्रचार-प्रसार असा काही केला गेला आहे, की भारतीयांचे डोळे दिपून जावेत.

मेट्रो लाइन्सची उद्घाटनं, एक्स्प्रेस-वे, रेल्वेमार्ग, टनेल्स, पूल, राष्ट्रीय महामार्ग वगैरेंची उद्घाटनं, देशातील भव्य मूर्ती आणि पुतळ्यांच्या अनावरणाचे समारंभ वगैरेंचाही सपाटा चालू आहे. मंगळयान उडलं, चांद्रयान स्थिरावलं, आदित्ययान उडणार, समुद्रयान जाणार…वगैरे सगळ्या वैज्ञानिक योगदानाच्या बातम्या राजकीय बनवल्या गेल्या आहेत. या सगळ्याचा ओघ एवढा आहे, की माणसं या बातम्यांमध्ये धुंवाधार धुतली जात आहेत.

मोदी आणि त्यांचं सरकार जसं ‘ॲक्टिव्ह’ आहे, तसाच भाजप हा पक्षही. एक महिना, एक आठवडा, एक दिवस ते भाकड जाऊ देत नाहीत. माध्यमांमध्ये त्यांचा, त्यांच्या नेत्याचा, त्यांच्या विचारांचा प्रभाव टिकून राहील, यासाठी हा पक्ष आणि त्यांची यंत्रणा अहोरात्र काम करताना दिसते. जनसंपर्क यात्रा, नेत्यांचे मेळावे, निवडणूक तयाऱ्या, विरोधकांवर आरोप, वाद निर्माण करणे, बातम्या सोडून देणे, सरकारने घेतलेल्या निर्णयांचे आक्रमक समर्थन करणे, अडचणींच्या विषयावर विषय सोडून विरोधकांवर हल्ले करणे वगैरे अनेक मार्गांचा अवलंब करून माध्यमांतली आणि त्यामुळे मनामनांतली ‘स्पेस’ व्यापून टाकण्याचं जबरदस्त तंत्र या पक्षाने आत्मसात केलेलं आहे आणि अवलंबलं आहे.

इतके ॲक्टिव्ह पंतप्रधान आणि पक्ष यापूर्वी भारताने पाहिला नव्हता. स्वातंत्र्यानंतरच्या देशउभारणीच्या प्रक्रियेत जवाहरलाल नेहरू केंद्रस्थानी होते, तेव्हा सारा देश त्यांच्या भोवती फिरत होता म्हणतात. त्यानंतर कमी-अधिक फरकाने इंदिरा गांधींभोवती फिरला. पण गेल्या वीस-पंचवीस वर्षांत भारत बराच बदलला, देशात पैसा आला, माध्यमं वाढली, सरकारचा पसारा वाढला. त्यामुळे नेहरू-इंदिरा यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणाऱ्या मोदींनी स्वत:भोवती देश उभा करण्याचा अचाट नि अफाट उपक्रम यशस्वीपणे चालवला आहे. त्यासाठी सत्तेचं केंद्रीकरण अभूतपूर्व रीतीने घडवून आणलं आहे. निवडणुका अलीकडे ओढल्या गेल्या नाहीत तर पुढील सहा महिने हा महाउपक्रम आणि त्यांनी चालवलेलं महायंत्र आणखी वेगाने गरगरताना दिसणार आहे.

फार मागचं सोडा; फक्त गेल्या तीन महिन्यांकडे मागे वळून पाहा. आपण किती वेगाने फिरणाऱ्या यंत्रात बसलो आहोत आणि गरगरतो आहोत हे लक्षात येईल.

चार महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय किर्तीच्या महिला पहिलवानांनी लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज उठवून निदर्शनं सुरू केली आणि तिकडे मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढली गेली. त्यानंतर दोन्हीकडची परिस्थिती हाताबाहेर गेली. सरकार टीकेचे धनी होऊ लागलं. पण दोन्ही बाबतीत सरकार बधलं नाही. दोन्ही ठिकाणची परिस्थिती चिघळली; पण ना सरकारने, ना सत्तापक्षाने, ना पंतप्रधानांनी आपला हट्ट सोडला! राजकीय नुकसान होत असूनही मंडळी अडून राहिली. अखेरीस बेरोजगारी, महागाई, विषमता हे मुद्दे मागे पडावेत यासाठी हे वादविषय मिटवले जात नाहीयेत, असं काही मंडळी म्हणू लागली.

ते काहीही असो; पण तेव्हापासून सरकारने इव्हेंट-उपक्रम-घोषणा-निर्णय यांचा असा काही धडाका लावलाय, की बाकीचे सगळे मुद्दे हवेत उडून गेले आहेत. अशा अनेक गोष्टी घडवल्या जात आहेत ज्यामुळे समाजमन सुखावूनही जात आहे. विविध समाजघटकांच्या अस्मितांचे प्रतीक असलेल्या महामानवांच्या पुतळ्यांचं अनावरण हे त्यातलं एक. महात्मा बसवेश्वरांपासून आदि शंकराचार्यांपर्यंतच्या अनेक पुतळ्यांची अनेक उदाहरणं त्याची साक्ष आहेत. (ही अनावरणं त्या त्या राज्यांच्या निवडणुकीच्या तोंडावर होतात हाही योगायोगच म्हणायचा का!)

महिला आरक्षण विधेयक, राष्ट्रद्रोह कायद्यात दुरुस्ती, दिल्ली सरकारच्या निर्णय अधिकारांबाबतचं विधेयक अशी काही विधेयकं सरकारने संसदेत आणली आहेत. त्यांबाबत वाद होणार हे माहीत असूनही ती आणली गेली. किंबहुना त्यावर वाद व्हावेत आणि विरोधकांना खिंडीत गाठावं यासाठीच ही विधेयकं आणली गेली असावीत.

दोन दिवसांचं जी ट्वेंटी संमेलन! पण ते वर्षभर साजरं केलं गेलं. त्यासाठी शहरं सजवली गेली. रोषणाई झाली. खरंतर क्रमाक्रमाने एकेका देशात हे संमेलन भरवलं जातं. पण हवा अशी तयार केली गेली की काहीतरी भव्यदिव्य घडतंय. या संमेलनात भारताच्या पदरात काय पडलं हे अलाहिदा. पण हा इव्हेंट आटोपल्याच्या दुसऱ्या दिवशी पुढच्या इव्हेंटची तयारी सुरू झालेली होती.

गेल्या तीन महिन्यांत मोदींनी अमेरिका, इजिप्त, दक्षिण आफ्रिका, ग्रीस, इंडोनेशिया, फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिरात यांचे दौरे केलेले आहेत. शिवाय जपान, सौदी अरेबिया, पापुआ न्यूगिनी, बांगला देश वगैरेंचेही त्याच्या आसपासच. मोदी गेले, चर्चा केली, परत आले असं कधीच घडलेलं नाही. जाणार-जाणार, गेले-गेले, आले-आले असं कवित्व आठ-दहा दिवस तरी चालतं. तेही इतकं प्रभावीपणे की आपण फक्त पाहतच राहतो.

लोकांना चर्चेसाठी विषय द्यायचे ही खास मोदीनीती. खरंतर लोकशाही देशात राष्ट्रीय हिताचे विषय चर्चेसाठी जनतेला खुले करणं ही स्वागतार्ह गोष्ट आहे. पण मोदी आणि भाजपची शैली वेगळी आहे. चर्चा होईल, तज्ज्ञ मतं मांडतील, माध्यमांमध्ये मतंमतांतरं पुढे येतील, जनभावना कळेल आणि मग सरकार भूमिका ठरवेल, ही त्यांची पद्धत नाही. निर्णय झाल्यावरच विषय चर्चेसाठी सोडले जातात. समान नागरी कायदा, एक देश-एक निवडणूक, देशाचं नाव इंडियाऐवजी भारत, सनातन धर्म वगैरे विषयांवर भाजपचं निश्चित मत आहे. लोक-तज्ज्ञ-माध्यमं काहीही म्हणाली तरी ते मत बदलणारं नाही. त्यामुळेच देशासमोरच्या गंभीर प्रश्नांची चर्चा मागे पडावी म्हणून असे वादविषय चर्चेसाठी सोडले जातात, असं विरोधक म्हणू लागले आहेत. हे खरं असेल तर सत्तापक्ष खरोखरच हुशार म्हणायचा!

वादविषय बनवण्याचा हा कारखाना सत्तापक्ष यशस्वीपणे चालवताना दिसतो आहे. विरोधी पक्षांनी आपल्या आघाडीचं नाव ‘इंडिया’ असं ठेवलं, त्यावरून भाजपच्या नेत्या-प्रवक्त्यांनी किती राळ उडवावी! विरोधकांनी स्वत:ला काय संबोधावं हा त्यांचा प्रश्‍न होता, पण भाजपजन त्यात उतरले आणि हे विरोधक कसे भारतविरोधी आहेत, असं सांगू लागले. कशाचा कशाशी संबंध नव्हता, पण आठ-पंधरा दिवस या वादात लोक ओढले गेले.

राहुल गांधींचा संसदेतील भाषणानंतरचा कथित फ्लाईंग किस असो, नाहीतर सोनिया-राहुल यांची चिनी कम्युनिस्ट नेत्यांशी झालेली कथित भेट असो…भाजपचे नेते त्यावर गदारोळ उठवतात. अडानी, जाती जनगणना, महागाई-बेरोजगारी वगैरे विषयांना माध्यमांमध्ये आणि जनमानसामध्ये जागाच मिळू नये, यासाठी हे केलं जातं असं सांगितलं जातं. अमित मालवीय, हेमंत बिस्वसर्मा, राजवर्धन राठोड, स्मृति इराणी, अनुराग ठाकूर, गिरीराज सिंह, निशिकांत दुबे यांच्यासारखी फौज हे काम फत्ते करण्यासाठी सदैव तयारच असते असं दिसतं.

याशिवाय तोंडी लावायला नेहरू, सुभाषबाबू, सरदार पटेल, डॉ. आंबेडकर यांच्या अनुषंगाने काँग्रेसला धारेवर धरणं, इडी-सीबीआय-इन्कमटॅक्सच्या धाडी आणि चौकशीवरून विरोधकांना कोंडीत पकडणं, राहुल गांधी आणि इतर अनेक संसदसदस्यांना बडतर्फीपासून सदस्यत्व गमावण्यात हातभार लावणं, विरोधकांची सरकारं असलेल्या राज्यांत राज्यपालांच्या आक्षेपार्ह वर्तणुकीकडे कानाडोळा करणं, विरोधकांची सरकारं पडतील अशी व्यवस्था करणं आणि नंतर चर्चेच्या कुस्तीत धोबीपछाड देणं, बंगाल-कर्नाटक वगैरे सरकारं लवकरच पडणार, नितीशकुमार पुन्हा रालोआत येणार वगैरे बातम्या पेरणं असे एक ना अनेक उपक्रम अथकपणे चालू असतात.

निव्वळ गेल्या तीन महिन्यांवर नजर फिरवली तर किमान एवढ्या ठळक घटना-घडामोडी-उपक्रम सत्तापक्ष, सरकार आणि त्यांच्या सर्वोच्च नेत्यांमार्फत राबवले गेलेले दिसतात. हा वेग कुणालाही गरगरून टाकणारा आहे. पण त्याचे घडते घडविते दमायला तयार नाहीत. ते या खेळात मोठेच तरबेज आहेत. त्यामुळे हा खेळ चालूच राहणार आहे असं दिसत आहे.

ज्याअर्थी हा खेळ नऊ वर्षं चालू आहे त्याअर्थी त्याला लोकपाठिंबा आहे, असं मानायचं का? दुसरी शक्यता अशीही आहे, की हा खेळ बघून बघून नि त्यात सहभागी होऊन होऊन लोकांना फटिगही आलेला असू शकतो.

यातलं काय खरं, हे गरगरायला लावणाऱ्या यंत्रात बसल्यामुळे कळेनासं झालं आहे.

—–

ता. क. : २०१९च्या निवडणुकीआधी आमच्या ‘युनिक स्कूल ऑफ जर्नालिझम’च्या विद्यार्थ्यांनी मोदीप्रणित घोषणा, इव्हेंटस आणि चर्चेसाठी सोडलेल्या वादविषयांची एक यादी बनवली होती. चांगल्या दीड-दोनशे बाबी त्यात नोंदवल्या होत्या. आज अशी यादी बनवणं अशक्य आहे. कारण तेव्हा छोट्या असलेल्या यंत्राने आता अजस्त्र रूप धारण केलं आहे.

—–

(कृपया लेखातील कंटेंटबद्दल चर्चा करावी. पूर्वग्रह किंवा दुराग्रहाने कॉमेंट्स करण्याची ही जागा नव्हे. वैयक्तिक आरोप करणे किंवा प्रचारकी प्रतिक्रिया देणे यातून हाती काय लागणार? त्यामुळे कृपया अभिनिवेशी प्रतिक्रिया टाळाव्यात. लेखातील मुद्द्यांना धरून असलेल्या प्रतिक्रियांचं मात्र स्वागत आहे.)

लेखक – सुहास कुलकर्णी
(तीन दशकांहून अधिक काळ भारतातील राजकीय घडामोडींवर लेखन. त्यातही देशातील प्रादेशिक स्तरावरील घडामोडींच्या विश्लेषणावर भर. हे लेखन करताना सामाजिक शास्त्राची शिस्त आणि पत्रकारी कौशल्य यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न. – युनिक फीचर्स, अनुभव मासिक, समकालीन प्रकाशन यांची सुरुवातीपासून संपादनाची जबाबदारी. – असा घडला भारत, महाराष्ट्र दर्शन, यांनी घडवलं सहस्त्रक या माहितीकोशांचं संपादन. अर्धी मुंबई, देवाच्या नावाने, शोधा खोदा लिहा या शोधपत्रकारी पुस्तकांचं संपादन. विठ्ठल रामजी शिंदे समजून घेताना, अवलिये आप्त, आमचा पत्रकारी खटाटोप आदि पुस्तकांचं लेखन. – इतरही काही पुस्तकांसह सुहास पळशीकर यांच्यासमवेत ‘महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष’ या पुस्तकाचं सहसंपादन.)
Email Id : [email protected]