हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. परंतु नवीन पक्ष निवडताना राष्ट्रवादी काँग्रेसच का निवडला असा प्रश्न विचारला असता खडसे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. खडसे म्हणाले की, मला वाटलं राष्ट्रवादीत जावं, म्हणून हा निर्णय घेतला. या निर्णयाआधी मी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यांची देखील राष्ट्रवादीत प्रवेश करावा अशी भावना होती. सर्वांशी चर्चेनंतर हा निर्णय घेतला आहे, असं खडसे म्हणाले. ते म्हणाले की, राष्ट्रवादीत प्रवेशासाठी मला कुठलंही आश्वासन नाही. माझीही काही अपेक्षा नाही. मला पदाची अपेक्षा नाही, मात्र माझ्या मतदारसंघातील विकासकामं सरकारच्या माध्यमातून पूर्ण केली जावीत एवढीच इच्छा आहे.
फडणवीसांवर केले गंभीर आरोप
देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर पक्षातील अनेक नेते नाराज आहेत. परंतु, हे नेते समोर येऊन बोलत नाहीत. एवढेच काय भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेदेखील देवेंद्र फडणवीस यांना विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत, असा दावा खडसे यांनी केला.
देवेंद्र फडणवीस जोपर्यंत पक्षात आहेत तोपर्यंत मला न्याय मिळणार नाही अशी माझी भावना झाली, म्हणून मी पक्ष सोडला. मी पक्षाला दोष दिला नाही, नेतृत्वाला दिला. एकाही नेत्याने भाजप सोडणार कळाल्यावर फोन केला नाही. चार दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी फोन केला. केंद्रीय नेतृत्वाने मला गांभीर्याने घेतले नाही असेही खडसे म्हणाले.
पक्षात आम्ही काय आयतं आलेलो नव्हतो
खडसे म्हणाले की, मी नालायक असतो तर 40 वर्षात एकाचही वाईट मत कसं आलं नाही. हेतूपरस्पर मला त्रास दिला गेला. तिकिट दिलं नाही याचं दुख नाही. पण आरोप केले याचं दु:ख आहे. पक्षात आम्ही काय आयतं आलेलो नव्हतो. आम्ही पक्षासाठी काम केलं होते. पक्षात आपली गरज नाही हे लक्षात आलं म्हणून पक्ष सोडला असल्याचं ते म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’