हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या भोसरी जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमलेल्या झोटिंग समितीचा अहवाल मंत्रालयातून गायब झाल्याने खळबळ उडाली असून तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. हा झोटिंग समितीचा अहवाल गहाळ झाला की कुणी गायब केला? अशी शंका कुशंकाही या निमत्ताने घेतली जात आहे.
फडणवीसांनी नेमलेल्या झोटिंग समितीचा अहवाल हा 2017 मध्येच आला होता. एकनाथ खडसे यांनी विधानसभेच्या अखेरच्या दिवशी विधानसभेत हा अहवाल सादर करण्याची मागणी केली होती. जेणेकरून त्यांच्यावर असलेले आरोप खरे आहेत की खोटे, हे जनतेला समजेल असे खडसे म्हणाले होते. मात्र, फडणवीसांनी फक्त क्लिन चिट देत अहवाल निरर्थक असल्याचे सांगत सादर करणे टाळले होते.
सध्या याच जमीन घोटाळा प्रकरणात ईडीकडून खडसेंची चौकशी सुरू आहे. अशावेळी निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी हा अहवाल खडसे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, आता हा अहवालाच सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना सापडत नसल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.