दादा खरं बोलले, मेगाभरतीमुळेच भाजपनं सरकार घालवलं; एकनाथ खडसेंचा भाजपला घरचा आहेर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव प्रतिनिधी । ”भाजपमध्ये काही मागावं लागत नाही. पक्षासाठी काम करणाऱ्यांना आपोआप मिळतं. ही भाजपची संस्कृती आहे. मात्र, निवडणुकीपूर्वी झालेल्या मेगाभरतीमुळं ही संस्कृती कुठंतरी ढासळली. मेगाभरती ही चूकच होती,” असं जाहीर विधान काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होत. पाटील यांच्या याच विधानाचा धागा पकडून भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसेंनी पुन्हा खदखद व्यक्त केली.

“मेगाभरतीमुळेच भाजपने सरकार घालवले हे दादांचं म्हणणं अगदी बरोबर आहे” असं म्हणत भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला घरचा आहेर दिला. एकनाथ खडसे जळगावातील आपल्या ‘मुक्ताई’ या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधत बोलत होते. भाजप नैतृत्वाने निष्ठावंतांना डावलून अगली बार २२० पार, अशी घोषणा देत नवीन लोकांना संधी दिली, त्यांना लोकांनी हरवले. मेगाभरतीचा दुष्परिणाम निश्चितच निवडणुकीवेळी झाला आहे. आता तरी पक्ष नितीमध्ये बदल करेल, असा टोला खडसेंनी लगावला.

ते पुढे म्हणाले, मेगाभरतीमध्ये जे घेतले आहेत, ते लगेच वाल्याचे वाल्मिकी होणार नाहीत. चंद्रकांतदादांनी म्हटले आहे की, “निष्ठावंतांवर अन्याय झाला आहे ही गोष्ट त्यांनी मान्य केली आहे,” असं खडसे म्हणाले. दरम्यान, कालच्या आपल्या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांनी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्याबाबत स्पष्टीकरण दिलं. “मी जे बोललो त्याचा विपर्यास केला. भाजपमध्ये जे कुणी वेगवेगळ्या पक्षातून आले त्यांचा आम्हला अभिमान आहे. त्यांचा आम्हाला फायदा झाला होता, आहे आणि होईल,” असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कालच्या विधानावरून यु-टर्न घेतला आहे.