राष्ट्रवादी प्रवेशावेळी खडसेंचे जोरदार शक्ती प्रदर्शन; हेलिकॉप्टरनं मुंबई गाठणार; तर हजारो कार्यकर्ते आधीचं गोळा

जळगाव । एकनाथ खडसेंनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता शुक्रवारी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवारांच्या उपस्थितीत एकनाथ खडसेंचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी खडसे समर्थक कार्यकर्ते मुंबईसाठी रवाना झालेत तर राष्ट्रवादीनंही कार्यक्रमाची जय्यत तयारी केली आहे.

जळगावमधून एकनाथ खडसे हे मुक्ताईनगर येथून हेलिकॉप्टरने मुंबईला जाणार आहेत. त्यांच्यासोबत जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे असतील, तर खडसे समर्थक कार्यकर्ते मुंबईसाठी आधीचं रवाना झाले आहेत. तुर्तास एकनाथ खडसेंच्या सूनबाई खासदार रक्षा खडसे यांनी भाजपामध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र एकनाथ खडसेंसोबत भाजपाचे काही माजी आमदारही राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

‘भाजपमधील 10-12 आमदार माझ्या संपर्कात’
दरम्यान, राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेत असताना, ‘माझ्यासोबत उद्या भाजपचे 15-16 माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार असून भाजपमधील 10-12 आमदार माझ्या संपर्कात आहेत, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. पक्षांतर बंदी कारणामुळे आमदार तूर्तास सोबत येणार नाही. निवडणुकाही त्यांना परवडणार नाहीत. पण भाजपचे 10-12 माजी आमदारही माझ्या संपर्कात असून त्यापैकी दोन-चार माजी आमदार उद्या माझ्यासोबत राष्ट्रवादीत प्रवेश करतील. नगराध्यक्ष आणि सहकार क्षेत्रातील पदाधिकारी उद्या माझ्यासोबत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, असंही खडसे यांनी सांगितलं.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in