हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे यांनी एकत्रीतरितीने पत्रकार परिषद घेतली. यावेळी फडणवीसांनी भाजपने निर्णय घेतला असून एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री होणार असून त्यांचा एकट्याचाच आज शपथविधी होईल, अशी घोषणा केली. यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली. “आज भाजपने बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिल्याबद्दल देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानतो”, असे शिंदे यांनी म्हंटले.
मुंबईत भाजपच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, आमदारांचे संख्याबळ पाहता भाजप नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे ठेवू शकले असते. पण त्यांनी आज मनाचा मोठेपणा दाखवला. असा मोठ्या मनाचा नेता मी आतापर्यंत पाहिलेला नाही.
भाजपाकडे 120 आमदारांचे संख्याबळ आहे. असे असताना देखील फडणवीस मुख्यमंत्रीपद घेऊ शकले असते. मात्र, त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला. यासाठी मी सर्वांचे आभार मानतो. ही एक ऐतिहासिक घटना आहे. कुणाला काही मंत्रीपद पाहिजे असे काही नव्हते, असे शिंदे यांनी सांगितले आहे.