हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे त्यांच्या 25 हुन अधिक आमदारांसह गुजरातमध्ये आहेत. दरम्यान शिंदे यांच्याशी शिवसेनेच्या काही आमदारांचा संपर्क झाला असून त्यांनी शिंदे यांच्याशी चर्चाही केली आहे. या चर्चेदरम्यान शिंदे यांनी संबंधित आमदारांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावे आणि भाजप सरकारसोबत सत्ता स्थापन करावी, असा प्रस्ताव दिला आहे.
विधान परिषद निवडणुकीचे मतदान पूर्ण झाल्यानंतरपासूनच एकनाथ शिंदे सुमारे 25 आमदारांसह शिवसेनेसोबत फारकत घेतली आहे. दरम्यान शिवसेनेच्या संजय राठोड, समाज बांगर, दादा भुसे यांनी चर्चा केली. शिंदे सोबत झालेल्या चर्चेनंतर शिंदे यांनी फडणवीस यांना मुख्यमंत्री तर मला उपमुख्यमंत्री करावे, असे सांगितले.
त्यानंतर संबंधित नेते शिंदे यांचा प्रस्ताव घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले असून त्यांनी तसा प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेवला आहे. आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर शिंदे यांच्याकडून आज दुपारी पत्रकार परिषद घेतली जाणार आहे.