हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांच्या मेळाव्याला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी विरोधकांसह नाव न घेता संजय राऊतांवर निशाणा साधला. “बाळासाहेब सांगायचे शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागता कामा नये. मात्र, शिवसेना आणि शिवसैनिक संपवण्याची काहींनी सुपारी घेतली होती. ती कुणी कुणाकडून घेतली होती? शिवसेनेला संपविण्याचा कट रचला होता,” असे एकनाथ शिंदे यांनी म्हंटले.
मेळाव्यात संजय शिरसाट व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिंदे म्हणाले की, “मध्यरात्री असा मेळावा कोण घेऊ शकत नाही. आजचा मेळावा ऐतिहासिक आहे आणि आम्ही ऐतिहासिकच कामगिरी केली आहे. आम्ही पाहिले कि, सहा महिन्यात एक चित्र दिसत गेले. जे सगळीकडे आम्हाला घातक दिसू लागले. ही परिस्थिती बदलण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. राष्ट्रवादी कडूनही राजकारण करण्यात आले. आम्ही पाहिले कि, राष्ट्रवादी कॉंग्रेस सगळीकडेच आमदारकीची तयारी करत होते. पण आमदारांना निधी मिळत नव्हता, यात आमदारांचा स्वार्थ नाही, पण जनतेची कामे लक्षात घ्यावी लागतात.
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात शिवसेना व शिवसैनिकांची उपेक्षा झाली. शिवसैनिकांना काहीही मिळालेले नाही. आम्ही घेतलेले निर्णय दोन वर्षापूर्वीच होणे गरजेचे होते.”