विकासाला अडथळा आणणाऱ्या नक्षली कारवायांचा शासन कठोरपणे बिमोड करेलच; एकनाथ शिंदेचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगत कोटगुल-ग्यारापत्ती जंगल परिसरात ‘सी-६०’ पोलिसांशी झालेल्या चकमकीत शनिवारी २६ नक्षलवादी ठार झाले. ही चकमक सुमारे चार तास सुरू होती. चकमकीत तीन पोलीस गंभीर जखमी झाले असून त्यांना हेलिकॉप्टरने नागपूर येथे हलवण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांचे कौतुक करत नक्षलवाद्यांना इशारा दिला आहे. विकासाला अडथळा आणणाऱ्या नक्षली कारवायांचा शासन कठोरपणे बिमोड करेलच, असे एकनाथ शिंदे यांनी म्हंटल.

एकनाथ शिंदे म्हणाले, कोरची तालुक्यातील मरदिनटोला जंगलात गडचिरोली पोलिसांच्या सी ६० पथकाच्या जवानांनी शनिवारी १३ नोव्हेंबर रोजी २६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. गडचिरोली पोलिस आणि सी ६० जवानांचं मनापासून अभिनंदन. पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेचं देखील हे मोठं यश आहे.

या कारवाईत चार पोलिसही जखमी झाले असून त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत. शासन त्यांच्या उपचारामध्ये कुठलीही कमतरता ठेवणार नाही. नक्षलवाद्यांविरोधातली कारवाई यापुढेही अशाच पद्धतीने सुरू ठेवली जाईल. गडचिरोलीचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध आहे.

विकासाला अडथळा आणणाऱ्या नक्षली कारवायांचा शासन कठोरपणे बिमोड करेल. शरणागती पत्करून मुख्य प्रवाहात येऊ इच्छिणाऱ्या नक्षलवाद्यांच्या पुर्नवसनासाठी शासनाचं धोरण आहे. त्यामुळे हिंसेचा मार्ग सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात नक्षलवाद्यांनी यावं, असं पालकमंत्री या नात्याने आवाहन करतो असे एकनाथ शिंदे यांनी म्हंटल.

दरम्यान, मुरूम गाव परिसरातील मर्दिनटोलाच्या जंगलात उडालेल्या चकमकीत तब्बल 26 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आले. तर नक्षलवाद्यांनी पोलिसांवर बेछूट गोळीबार केला. यात पोलिसांचे तीन जवान गंभीर जखमी झाले. जखमी पोलीस जवानांना हेलिकॉप्टरने नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनास्थळी अजूनही पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे.

You might also like