हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. काल दिवसभर ईडीने राऊतांच्या घरी छापेमारी आणि कागदोपत्रांची तपासणी केली यावेळी सुमारे 11 लाख 50 हजार रुपयांची रक्कम हाती लागली. मात्र यातील जवळपास 10 लाखांची रक्कम असणाऱ्या पाकिटावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. काही प्रसारमाध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे. त्यामुळे चर्चाना उधाण आले आहे.
काल संध्याकाळी राऊत यांच्या घरी ईडीला सुमारे साडे अकरा लाख रुपयांची रक्कम सापडली. त्यातील दहा लाखांच्या बंडलावर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असे लिहिलेले आहे. अशी माहिती मिळत आहे. हे पैसे पक्षाच्या कामासाठी खर्च करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते आहे. तसेच बाकीचे दीड लाख रुपये हे घरातील खर्चासाठी ठेवण्यात आल्याची माहिती आहे. नोटेवर शिंदेंचे नाव असल्याने आता तपासाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे याना याबाबत विचारलं असता या पैशाची माहिती मला माहित नाही, संजय राऊतांनाच याबाबत माहिती असेल असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले तर शिंदे गटातील आमदार संजय शिरसाठ यांनी या पैशावरून राऊतांवर टीका केली. राऊतांच्या घरी सापडलेले 10 ते 11 लाख रुपये एकनाथ शिंदेनी राम मंदिराच्या उभारणीसाठी दिले होते, तेही या माणसाने घरी ठेवले की काय असं वाटतं. अशी टीका त्यांनी केली.