सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
लोकसभेच्या निवडणुकीत जाती पातीच्या विषारी प्रयोगाला थारा न देता जनतेने मला निवडून दिले आहे. आता अजितराव घोरपडे यांना विधानसभेला निवडून देण्याचे आवाहन खासदार संजयकाका पाटील यांनी केले. तासगांव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघ भाजपाच्यावतीने आयोजित केलेल्या कवठेमहांकाळ येथील नागरी सत्कार समारंभ प्रसंगी खासदार पाटील बोलत होते.
प्रारंभी माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्या हस्ते खासदार संजयकाका पाटील यांचा व भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार पृथ्वीराज देशमुख यांचा नागरी सत्कार करण्यात आला. भाजपाला लोकसभा निवडणुकीत अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणार्या काँग्रेस महाआघाडीला जनतेने चोख उत्तर दिले आहे. विश्वासाला तडा जाऊ जावू देणार नाही. यापुढील सत्कार समारंभ हा अजितराव घोरपडे आमदार झाल्यानंतरच होणार असल्याची ग्वाही आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संघटक मकरंद देशपांडे,माजी आमदार रमेश शेंडगे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक चंद्रकांत हाके यांची भाषणे झाली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन दिनकर पाटील-सोनीकर यांनी स्वागत प्रास्ताविक केले तर पांडुरंग पाटील यांनी आभार मानले.