कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कृष्णा सहकारी साखर कारखान्याची होऊ घातलेली निवडणूक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तात्काळ रद्द करण्याची मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी केली आहे. निवडणूक रद्द करण्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्याचे प्रसिध्दी पत्रकाद्वारे सांगितले आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की, आपण सर्वजण कोरोना सारख्या महामारी विरूद्ध लढा देत आहोत. साधारण मागीलवर्षी सुध्दा कोरोनाने अनेकांचा बळी घेतला. सर्वसामान्य लोकांचे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यावर्षीही कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. अनेक लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. गेले दिड ते दोन महिने झाले, प्रशासनाच्या वतीने सातारा जिल्ह्यात लाॅकडाऊन चालू आहे. लाॅकडाऊन असूनही कोरोनाचे प्रमाण कमी होताना दिसत नाही.
अशातच कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. आता नामनिर्देशन भरायची प्रक्रिया चालू झाली आहे. एकीकडे कोरोनाने थैमान घातले असताना, अशातच कृष्णा कारखान्याची निवडणूक प्रक्रिया चालू झाली आहे. त्याचा बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत.
निवडणूक लागली म्हणजे प्रचार सभा मेळावे आलेच, त्यामुळे गर्दी मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यातच कृष्णा कारखान्याचे कार्यक्षेत्र हे दोन जिल्ह्यात विभागले आहे. सांगली आणि सातारा जिल्ह्यात निवडणुकीमुळे कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे कारखान्याच्या सभासदांच्या जीवावर ही निवडणूक असणार आहे. प्रशासन जर कारखान्याच्या सभासदांच्या जिवावर उठून जर ही निवडणूक लढवणार असेल, तर त्याला आमचा विरोध राहील. या निमित्ताने कारखान्यांच्या शेतकरी सभासदांना जाहीर आव्हान करतो, की शेतकरी भावांनो हे राजकीय पक्ष निवडणूक लढवून मोकळे होतील. कोरोनामुळे आपले कुटुंब अडचणीत येईल, त्यामुळे आपल्या कुटूंबाची काळजी घ्या आणि निवडणुकीवर बहिष्कार घाला. प्रशासनाच्यावतीने जोपर्यंत कोरोनाचे प्रमाण कमी होत नाही, तोपर्यंत तोपर्यंत निवडणूक पुढे ढकलावी. सभासदांचा जीव धोक्यात घालू नये, असे दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी म्हटले आहे.