राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत सुरु होणार एलिफंट सफारी; सरकार राबवणार मोठा प्रकल्प

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वन्य हत्तींचे वाढते संकट पाहता राज्य सरकारने व्याघ्र प्रकल्पाच्या धर्तीवर एलिफंट पार्क विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, गोंदिया या ठिकाणी उद्यान उभारण्यात येणार असून एलिफंट सफारी (Elephant Safari) करण्यात येणार आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी याबाबत माहिती दिली आहे.

मुनगंटीवार म्हणाले, राज्यात यापूर्वी जंगली हत्तींचे संकट नव्हते. पण, गेल्या काही वर्षांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हे दिसून येत आहे. राज्यात यापूर्वी व्याघ्र प्रकल्प राबवण्यात आले मात्र हत्तींसाठी कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आली नाही. मात्र आता व्याघ्र प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात एलिफंटनेट पार्क विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सुरुवातीला कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, गोंदिया या भागात एलिफंट सफर सुरु करणार आहे. केंद्र सरकारकडून एलिफंट पार्क बनवण्यासाठी कोणतीही तरतूद नसली तरी राज्यात जंगली हत्तींचा वाढता धोका पाहता आम्ही हा निर्णय घेतला आहे.

मुनगंटीवार पुढे म्हणाले, सध्या कायद्यानुसार हत्तींमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची तरतूद नाही. मात्र, त्यासाठी आम्ही तरतूद केली आहे. हत्तीच्या आक्रमणामुळे शेतीचे नुकसान झाल्यास, मनुष्यहानी झाल्यास नुकसान भरपाई घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासोबतच वन्य प्राण्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये दिल्या जाणाऱ्या भरपाईमध्येही वाढ करण्यात आली असून आम्ही जनता आणि वन्य प्राणी यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी सातत्याने काम करत आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं.