मुंबई प्रतिनिधी । भाजपानं ऐन विधानसभा निवडणुकांच्या काळात निष्ठावंतांना तिकीट नकारत डावललं होतं. यात एकनाथ खडसे हे नाव सर्वात पुढं होत. निवडणुकी दरम्यान आणि नंतरही खडसे याबाबतची आपली खंत वारंवार माध्यमांमध्ये बोलून दाखवत आहेत. या नाराजी प्रकरणात आता एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतल्यानं राजकीय चर्चाना उधाण आलं आहे. या भेटीतून सुरु झालेल्या चर्चांच्या मागचं कारण म्हणजे पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी गोपीनाथ गडावरील मेळाव्यासंदर्भात फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती.
या पोस्टमध्ये पंकजा यांनी समाजमाध्यमातून दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त निमंत्रित करताना समर्थकांना ‘मावळे’ शब्दाने हाक देत, पुढे काय करायचे? कोणत्या मार्गाने जायचे? असा मजकूर प्रसारित केला होता. अप्रत्यक्षरीत्या या पोस्टमधून पंकजा यांनी परळीत झालेल्या पराभवातून पक्षावरील आपली नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान खुद्द पंकजा मुंडे यांनी माझ्या फेसबुक पोस्टचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. आपण पक्षाशी एकनिष्ठ असल्याचं म्हटलं होत.
हे सर्व पाहता एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांना भाजपकडून चांगली वागणूक मिळाली नसल्याचं बोललं जात आहे. दरम्यान माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी “ओबीसी असल्यानेच पंकजा यांचं खच्चीकरण केलं जात असून, त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा. स्व. गोपीनाथ मुंडे यांनाही पक्षातून काढून टाकण्याचा ठरावही भाजपाने केला होता. मात्र, त्याला विरोध केल्यानं तो ठराव फेटाळण्यात आला. तोच प्रकाश पंकजा मुंडे यांच्यासोबत केला जात आहे,” असं प्रकाश शेंडगे म्हणाले होते. शेंडगे यांच्या आरोपानंतर भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर एकनाथ खडसे हे भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत. एकीकडं राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारला सत्तेवरून पायउतार झाली असताना खडसे, तावडे आणि पंकजा या सध्या समदुःखी असलेल्या तिघांच्या भेटीगाठी होणं भाजपमधील अंतर्गत धुसपूस अधोरेखित करत आहे. तसेच न राहवता फडणवीस यांच्यावर त्यांचा रोष हा आता माध्यमांतील प्रतिक्रियांमुळं लपून राहिला नाही आहे. अशा परिस्थिती राज्यात भाजपापुढं पक्ष संघटन टिकवून ठेवणं हे एक आव्हान ठरणारं असं दिसत आहे.