Thursday, March 30, 2023

 परीक्षेच्या तणावामुळे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

- Advertisement -

औरंगाबाद प्रतिनिधी। अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाचे सहा विषय राहिल्याने परीक्षेच्या तणावात एका 22 वर्षीय विद्यार्थाने गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शहरातील विद्यानगर भागात घडली. अक्षय सोमनाथ माने वय-22 (रा.ताडसोना, ता.जि. बीड, सध्या मुक्काम. विध्यानगर, औरंगाबाद) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
मृत अक्षय हा शहरातील एका नामांकित महाविद्यालयात सिव्हिल इंजिनियरचे शिक्षण घेत होता. शेवटच्या वर्षाचे त्याचे सहा विषय राहिले होते. त्यामुळे तो पाच ते सहा दिवसांपूर्वीच बीडहुन औरंगाबादेत राहणाऱ्या चुलत भाऊ जयदीप मानेकडे राहायला आला होता. भाऊ जयदीप हा बुधवारी सकाळी कामावर गेला होता. त्यानंतर अक्षय ने त्याच्या खोलीचा दरवाजा आतून बंद करून ठेवला होता.
जयदीप जेंव्हा नोकरीवरून रात्री  8 वाजेच्या सुमारास  घरी आला, तेंव्हा दरवाजा आतून बंद होता. अनेक वेळा आवाज देऊन देखील आतून प्रतिसाद मिळत नसल्याने जयदीपला संशय आला त्याने दरवाजा तोडला असता  छताच्या हुकाला शॉलच्या साहाय्याने अक्षयने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. या बाबात नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली असता, पुंडलीकनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कापसे,एल.व्ही हिंगे, पोलीस नाईक जगदीश चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत अक्षयला फासावरून उतरवत घाटी रुग्णालयात हलविले मात्र तो पर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती डॉक्टरांनी तपासून अक्षयला मृत घोषित केले.या प्रकरणी पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस नाईक बाबुराव पांढरे करीत आहेत.