Tuesday, February 7, 2023

इम्रान खान यांनी आधी आपला देश सांभाळावा; खान यांच्या प्रतिक्रियेनंतर चंदर यांनी फटकारले

- Advertisement -

टीम, HELLO महाराष्ट्र। नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून भारताला टोकणाऱ्या पाकिस्तानच्या पंतप्रधान इम्रान खान यांना संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी राजीव चंदर यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. इम्रान खान यांनी आधी आपला देश सांभाळावा असं चंदर म्हणाले आहेत. भारताने या कायद्याची अंमलबजावणी सुरु केली तर दक्षिण आशियाई देशांतील शरणार्थ्यांसाठी मोठी अडचण निर्माण होणार असल्याचं वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलं होतं.

यावर चंदर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तान मानवाधिकाराचा समर्थक असल्याचा आव आणतो. परंतु पाकिस्तानात १९४७ मध्ये अल्पसंख्यांकांची संख्या २३ टक्के होती आता ती ३ टक्क्यांवर आली आहे. पाकिस्तामधील काही कायदे, अल्पसंख्यांकांचा होणार छळ आणि सक्तीचं धर्मांतरण हे यामागील प्रमुख कारण असल्याचं ते म्हणाले.

- Advertisement -

भारतातील नागरिकांसाठी आणखी कोणी बोलण्याची गरज नाही. कमीत कमी द्वेषाच्या आधारावर ज्यांनी दहशतवादाचा उद्योग चालवला आहे, त्यांनी तरी यावर बोलू नये. आपला देश आणि देशातील नागरिकांच्या कल्याणासाठी काम करणं हे इम्रान खान यांच्यासाठी चांगलं असेल, असंही राजीव चंदर यांनी नमूद केलं. जम्मू-काश्मीरमधील संचारबंदीची स्थिती आणि सुधारीत नागरिकत्व कायद्यामुळे लाखो मुस्लिम भारत सोडून जाऊ शकतात. त्यामुळे शरणार्थींची नवीन समस्या निर्माण होईल असं इम्रान खान यापूर्वी म्हणाले होते.