मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनीच शिवसेनेतून छगन भुजबळ व नारायण राणे यांना फोडले होते. सत्तेत असताना त्यांनी जे केले होते त्याचीच आज पुनरावृत्ती होत आहे, अशी टीका शिवसेना नेते तथा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली आहे. नारायण राणे यांना काँग्रेसने नव्हे तर शरद पवारांनी फोडलं,असा खळबळजनक दावाही कदम यांनी केला .
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला . यावरूनच रामदास कदम यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडताना शरद पवार यांच्यासोबत कोल्हापूर येथे बैठक झाली होती. राष्ट्रवादीत त्यांना अपेक्षित मंत्रीपद मिळालं नाही, त्यामुळे राणे दिल्लीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला . छगन भुजबळ यांना देखील शरद पवार यांनीच फोडले, ज्या ज्या नेत्यांनी बाळासाहेबांना दु:ख दिलं ते सर्व भुईसपाट होत आहेत, असा घणाघात कदम यानी केला आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी विधानसभेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच आताही कॉंग्रेस आणि भाजपचे अनेक नेते भाजप आणि सेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अडचणी वाढणार आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप –सेना युतीची ताकद वाढत आहे. तर काँग्रेस -राष्ट्रवादी कमकुवत होताना दिसत आहे.