Tuesday, June 6, 2023

हर्सूल तलावात बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; घातपात की आत्महत्या अस्पष्ट

औरंगाबाद – दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या 25 वर्षीय तरुणाचा आज सकाळी हर्सूल तलावात मृतदेह तरंगताना आढळून आला. या मुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आत्महत्या की मग घातपात हे दुपार पर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही. प्रणित रमेश ठोंबरे वय-25, (रा.एकतानगर, जटवाडारोड) असे मृत तरुणाचे नाव आहे.

या घटने प्रकरणी अधिक माहिती अशी की, प्रणित हा शहरातील एका मॉलमध्ये कामाला होता. 17 नोव्हेंबर रोजी तो घरातून बाहेर पडला होता. मात्र रात्री तो घर आलाच नाही. सकाळी नातेवाईकांनी त्याची विचारपूस केली असता तो मिळून आला नसल्याने हर्सूल पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार दिली. आज सकाळी काही तरुण मॉर्निंगवॉक साठी हर्सूल तलावा जवळून जात असताना त्यांना मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. या बाबत नागरिकांनी पोलिसांना कळविले. नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.

ही बाब आजूबाजूच्या परिसरात कळताच प्रणित च्या नातेवाईकांनी तलावाकडे धाव घेत पाहणी केली असता मृतदेह प्राणितचाच असल्याची ओळख पटली. प्रणित ने आत्महत्या केली की मग या मागे काही घातपाताचा प्रकार आहे. हे दुपारपर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.