खळबळजनक! लस न देताच डॉक्टरने दिले 80 बोगस लस प्रमाणपत्रे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – महापालिकेच्या मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमधील घोटाळ्यांची मालिका सुरूच आहे. बोगस रुग्णांचे प्रकरण गाजल्यानंतर आता बोगस लसीकरण प्रमाणपत्राचे प्रकरण उघडकीस आले आहे. तब्बल नऊ जणांनी कोरोनाची लागण झालेली नसताना उपचार घेतल्याचे दाखवत कोटक महिंद्रा जनरल इन्शुरन्स कंपनीला लाखोंचा गंडा घातल्याने प्रकरण पोलिसांत गेले. त्यानंतर महापालिका प्रशासनाने बोगस प्रमाणपत्राची चौकशी केली असता, तब्बल 80 जणांनी बोगस प्रमाणपत्र दिले गेल्याचे समोर आले आहे. हे प्रमाणपत्र एक डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या मदतीने दिले आहेत. त्यानुसार प्रशासनाने एमआयडीसी चिकलठाणा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर कोरोना प्रतिबंधक लस न घेता अनेकांनी बोगस प्रमाणपत्र घेतल्याचे यापूर्वी उघडकीस आले होते. त्यावेळी प्रशासनाने पोलिसात तक्रार दिली; पण अद्याप चौकशी पूर्ण झालेली नाही. असे असतानाच जून 2021 ते जानेवारी 2022 या कालावधीत महापालिकेच्या मेल्ट्रॉन कोविड हेल्थ सेंटरमध्ये उपचार न घेता बोगस प्रमाणपत्र घेऊन चार लाख 62 हजार रुपयांचा विमा लाटल्याची तक्रार महिंद्रा कोटकचे मुख्य व्यवस्थापक जहीर खान अजगर खान यांनी नऊ जणांविरोधात एमआयडीसी सिडको पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकारानंतर महापालिकेने अंतर्गत चौकशी केली असता नऊ मार्च ते 31 मार्च या कालावधीत तब्बल 80 बोगस लसीकरण प्रमाणपत्रे दिल्याचे उघडकीस आले. नोंद होणाऱ्या रजिस्टरमधील हस्ताक्षरातील बदलामुळे हा प्रकार समोर आला. यांचा आहे समावेश बोगस प्रमाणपत्र प्रकरणात कंत्राटी डॉ. कॅमेडी झेन मॅथ्यू (रा. मुकुंदवाडी), डाटा एंट्री ऑपरेटर साबरी मोहम्मद इमरान (रा. चंपा चौक) यांच्या विरोधात प्रशासनातर्फे एमआयडीसी चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. त्यांना कामावरून काढण्यात आले आहे. मेल्ट्रॉन रुग्णालयाला 18 ऑक्टोबर 2021 ला लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. त्यानंतर 10 मार्चपासून पुढे काही बोगस प्रमाणपत्रे देण्यात आली. दरम्यान आणखी काही प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment