नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या ५ एप्रिलला संध्याकाळी ९ वाजता देशातील सर्व नागरिकांना घरातील लाईट बंद करून ९ मिनिटे दिवे, मेणबत्ती किंवा टॉर्च लावून कोरोना विरोधात लढा देण्यास सांगितले आहे. मात्र, यामुळे ९ मिनिटे एकाच वेळी लाईट बंद केल्यास तांत्रिक बिघाड होऊन संपूर्ण राज्य व देश अंधारात जाण्याचा धोका असल्याची शक्यता जाणकारांनी व्यक्ती केली होती. त्यावर केवळ घरातील दिवे बंद करण्यास सांगितले आहे. बाकी रस्त्यावरील पथदिवे, घरातील इतर विद्युत उपकरणे चालूच राहतील, असं स्पष्टीकरण केंद्रीय उर्जा मंत्रालयाने दिले आहे.
असं केल्याने देश किंवा राज्य अंधारात जाण्याचा धोका नसल्याचंही त्यांनी सांगितले आहे. गेल्या वेळी पंतप्रधानांनी थाळी नादाचे आवाहन केलं होत. त्यावेळी काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोकांनी एकत्रित येऊन सोशल डीस्टंसिंगचा फज्जा उडवत थाळी नाद केला होता. त्यामुळं यावेळी काही चूक होऊ नये म्हणून खबरदारी म्हणून केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने लोकांना केवळ घरातील दिवे बंद करण्याचं आवाहन केलं आहे.
दिवे एकाच वेळी बंद केल्यानं देश अंधारात जाण्याचा धोका?
पंतप्रधान मोदींच्या आवाहनाप्रमाणे येत्या ५ तारखेला एकाच वेळी सर्व दिवे बंद केल्यास अचानक फ्रिक्वेन्सी कमी जास्त झाल्याने संपूर्ण देश अंधारात जाण्याचा धोका असल्याचं जाणकारांनी सांगितलं होतं. यावर केंद्रीय उर्जा मंत्रालयाने आज स्पष्टीकरण दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन करताना केवळ घरातील दिवे बंद करण्यात सांगितले आहे असं उर्जा मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळं ५ तारखेच्या संध्याकाळी रस्त्यावरील दिवे, घरातील इतर सर्व विद्युत उपकरणे, रुग्णालय, पोलीस ठाण्यासह इतर महत्वाच्या ठिकाणी दिवे चालूच राहणार आहे. त्यामुळे ग्रीडमध्ये फ्रिक्वेन्सी फेल होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”