फडणवीसांनी मराठी भाषिकांच्या भावनेला छेद देण्याचं काम केलं; जयंत पाटील यांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : फडणवीसांनी मराठी भाषिकांच्या भावनेला छेद देण्याचं काम केलंय, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच फडणवीस कायमच दिल्लीश्वरांना खुश करण्यात व्यस्त असतात असा टोलाही पाटील यांनी यावेळी लगावला.

बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने शुभम शेळके यांना उमेदवारी दिली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बेळगावमध्ये आज पत्रकार परिषद घेत पाठिंबा जाहीर केला. यावेळी मंत्री पाटील म्हणाले, भाजप मागील पाच वर्षे महाराष्ट्रात सत्तेत होती, त्यावेळीही देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. शिवाय आता एकीकरण समितीविरोधात प्रचार करून भाजप मराठी भाषिकांसोबत नाही हे सिद्ध झाले आहे.

“देवेंद्र फडणवीस नेहमीच दिल्लीश्वरांना खुश करण्यात व्यस्त असतात, दिल्लीला जे बरं वाटेल तेच ते करतात. महाराष्ट्रातही आम्हाला त्याचा प्रत्यय येतो. कोरोना असेल, राज्यातील बाकी मागण्या असतील त्यांनी महाराष्ट्राची बाजू घेतली पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही,” असेही जयंत पाटील म्हणाले. मराठी भाषकांचा आवाज संसदेत बुलंद करण्यासाठी याआधी महाराष्ट्र एकीकरण समितीने लोकसभा निवडणूक लढवली होती. इथल्या विधिमंडळातही समितीचे लोकप्रतिनिधी आहेत. शुभम शेळके हा तरुण मराठी माणसांचे प्रश्न लोकसभेत पोटतिडकीने मांडेल याबाबत शंका नाही, असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नेहमीच इथल्या मराठी भाषकांना, त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे. त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शुभम शेळके यांना पाठिंबा देत असल्याचे जयंत पाटील यांनी जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, नेते छगन भुजबळ यांनी अनेक वेळा मराठी जणांच्या हक्कासाठी या भागात आंदोलने केली आहेत. महाराष्ट्राची, मराठी जणांची एकजूट कायम रहावी यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहतो, हा पाठिंबाही त्याचाच भाग असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment