रायगड प्रतिनिधी । फेसबुक सारख्या प्रसिद्ध सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर बनावट अकाऊंट तयार करून अश्लील छायाचित्र प्रसिध्द करणे एका तरुणाच्या चांगलाच अंगलट आलं आहे. या तरुण आरोपीने एका अल्पवयीन मुलीचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून त्यावरून कृत्य केलं आहे. या प्रकरणाचा रायगड पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाने कौशल्यपूर्णरित्या छडा लावत या तरुणाला गजाआड केले आहे. राजेंद्र तेलंगे असे या तरुणाचे नाव असून त्याला २ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
याप्रकरणी रायगड जिल्ह्यातील कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. अल्पवयीन मुलीचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून तिचे गावातील एका तरुणासोबतचे अश्लील फोटो फेसबुक अकाऊंटवर प्रसिध्द करून तिची बदनामी हा तरुण करत होता. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत गुन्हयाचे स्वरुप लक्षात घेऊन या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे निर्देश पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांनी दिले होते. गुन्ह्याची तांत्रिक बाब लक्षात घेत यानंतर गुन्ह्यचा प्रकरणाचा रायगड पोलिसांच्या सायबर शाखेकडे वर्ग करण्यात आला. सायबर सेलचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश साखरकर यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला.
त्यानुसार सखोल तपस करत फेसबुकच्या मुख्यालयाशी संपर्क साधून पिडीत मुलीच्या बनावट फेसबुक खात्याची चौकशी करण्यात आली. त्यांच्याकडून मिळालेली माहिती संकलन करून त्याचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. यानंतर छायाचित्र अपलोड करणाऱ्या मोबाईल नंबरचा शोध लावण्यात आला. हा मोबाईल नंबर कोणाच्या नावावर आहे. याचा शोध घेण्यात आला. तेव्हा हा मोबाईल कोलाड परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्र हलवली आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संबधित राजेंद्र यास चौकशीसाठी ताब्यात घेतले.
सदर आरोपीची कसून चौकशी केल्यानंतर अखेर आरोपीने आपल्या गुन्ह्यची कबूली दिली. यानंतर त्याला अटक करून कोलाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश साखरकर, पोलीस हवालदार शशीकांत भोईर, पोलीस नाईक अमोल घरत, पोलीस शिपाई शितल घरत, अक्षय पाटील, तुषार घरत, सिध्देश शिंदे यांनी महत्वाची भुमिका बजावली.