शेतकरी उद्धवस्त, औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा; जलील यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – जिल्ह्यात पावसाने अक्षरश: दाणादाण उडवली आहे. गेल्या आठवडाभर पावसाने होत्याचं नव्हतं केलंय. काढणीला आलेली पीकं डोळ्यादेखत वाहून गेलीत. अशा परिस्थितीत शेतकऱ्याचं हजारो-लाखो रुपयांचं नुकसान झालंय. त्यामुळे उद्धवस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची गरज असल्याचं सांगत औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तसं सविस्तर पत्र लिहिलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागातील शेतकरी बांधवांचं उभं पीक वाहून गेल्याचं आणि शेतात गुडघ्यापर्यंत पाणी साचून जमिनीवर मोठमोठे खड्डे पडल्याचे निदर्शनास येत असून त्याच शेतजमीनीवर शेती करणे शक्य होणार नाही. शेतकरी बांधवांचं फार मोठं नुकसान परतीच्या पावसाने झालं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लगोलग औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी जलील यांनी पत्राद्वारे केली आहे.

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात जलील काय म्हणाले ?
औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना महापुर आल्याने शेतकरी बांधवांचे व ग्रामस्थांचे आतोनात आर्थिक नुकसान झाले असून महाविकास आघाडी सरकारचे मंत्री, आमदार व सत्ताधारी पक्षाचे वरिष्ठ नेतेमंडळी यांनी पाहणी दौरा करुन नेहमीप्रमाणे फोटोसेशन केले आणि जिल्हाप्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करुन आठ ते दहा दिवसात शासनाच्या वतीने नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले होते. शेतकरी बांधव व ग्रामस्थांना शासनस्तरावरुन आर्थिक मदत मिळाली का? याची शहानिशा करण्यासाठी जिल्ह्याचा खासदार या नात्याने इम्तियाज जलील यांनी नुकसानग्रस्त भागाला प्रत्यक्ष भेटी देवून स्थळपाहणी केली.

औरंगाबाद जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागातील स्थळ पाहणीत शेतकरी बांधवांचे उभे पिक वाहून गेल्याचे आणि शेतात गुडघ्या पर्यंत पाणी साचून जमीनीवर मोठमोठे खड्डे पडल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत असून त्याच शेतजमीनीवर शेती करणे शक्य होणार नसल्याचे शेतकरी बांधवांनी सांगितले. नैसर्गिक आपत्तीमुळे हाती आलेले पिक वाया गेले आहे. मूग, उडीद, मका, तुर, ऊस, भुईमुग पाण्याखाली गेले असून कपाशी व सोयाबीनसह अन्य पिकांची यापेक्षा वेगळी स्थिती नाही. त्यामुळे शेतकरी बांधव आर्थिक अडचणीत सापडले असून कधीही न भरुन निघणारे आर्थिक नुकसान झाले आहे. आपण शेतकरी बांधवांना मदत करण्यासाठी तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा.

Leave a Comment