कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
राज्यातील शेतकऱ्याच्या विविध प्रशांवरून आज कराड येथील शेतकऱ्यांच्या वतीने राज्य सरकारसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत यांना इशारा देण्यात आला. राज्यातील शेतकऱ्यांना दररोज दिवसा 10 तास वीज द्यावी, त्यांचे ऊसाचे बील एफआरपीप्रामणे एक हप्त्यात द्यावे, 65 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या शेतकऱ्यांना दरमहा 5 हजार रुपये पेन्शन देण्यात यावी आदी मागण्या मान्य न केल्यास मुंबई येथे दि. 2 मे रोजी मंत्रालयासमोर तसेच राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्या घरासमोर आक्रोश भोंगे वाजवणार असल्याची माहिती आज शेतकरी व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.
काड येथील पत्रकार शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी कार्यककर्त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शेतकरी चळवळीचे नेते विनायकराव पाटील, शेतकरी संघटनेचे नेते पंजाबराव पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विनायकराव पाटील म्हणाले की, राज्यातील सर्वच राजकीय पक्षाच्या वाचाळ नेत्यांचे एकमेकाविरुध्द दररोज वाजणारे भोंगे बंद करावे, अन्यथा 2 मे रोजी मंबईमध्ये शेतकऱ्यांचे आक्रोश भोंगे ऐकायला मिळतील.
सध्या राज्य काय चालले आहे ? हेच कळत नाही. सत्ताधारी व विरोध पक्ष एकमेकांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप करून भांडत आहेत. त्यामुळे राज्यात पॉलिटीकल गंगवार चालू आहे असे वाटते. पुन्हा सत्तेत येण्यासाठी विरोधी पक्ष बेचैन आहे. राज्याचे सर्वच मंत्री अभि नही… तो कभी नही… हे धोरण अवलंबुन आपापले पोट भरण्यात मग्न आहेत. छोट्या पक्षाचे वाचाळ नेते जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करणारे स्वतःच्या प्रक्षोभक भाषणाचे भोंगे स्वतःच वाजवत आहेत. व दुसऱ्यांचे भोंगे खाली उतरवा असे म्हणत आहेत व त्याला उत्तर देण्यासाठी इतर पक्षाचे नेते चोवीस तास स्वतःचे भोंगे वाजवत आहेत.
त्यामुळे राज्यात गोंगाट निर्माण होऊन सामाजिक सलोख्याचे वातावरण गढूळ झाले आहे. तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे कोणाचेच लक्ष नाही. अशा गोंधळाच्या परिस्थितीत ईडी, सीबीआय, भ्रष्ट्राचार जातीवाद या सारख्या गोष्टींमध्ये गुरफटलेल्या सरकारला शेतक-यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास वेळ आहे कुठे? असा सवालही यावेळी पाटील यांनी उपस्थित केला आहे.