नवी दिल्ली । दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे गेल्या काही दिवासांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनातील एका शेतकऱ्याने आज आत्महत्येचा प्रयत्न केला. विष प्राशन केल्याचे लक्ष येताच त्या शेतकऱ्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यामुळे त्याचे प्राण वाचले. पण आपल्या आत्महत्येच्या प्रयत्नाला पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा कारणीभूत असल्याचा आरोप त्याने केला. पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यातील ६५ वर्षीय शेतकरी निरंजन सिंग यांनी सोमवारी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सिंघू सीमा इथं आंदोलन करणार्या हजारो शेतकऱ्यांपैकी निरंजन सिंग हे एक आहेत. निरंजन यांनी विष प्राशन केल्यानंतर त्यांना प्रथम पानीपतच्या रुग्णालयात आणि त्यानंतर रोहतकमधील पीजीआय हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथे त्यांची प्रकृती स्थिर आहे. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर निरंजन यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली.
‘मला आता बरं वाटतंय. पण शेतकरी आत्महत्येसारख्या घटना घडतील तेव्हा कदाचित सरकार जागे होईल. एखादी व्यक्ती आत्महत्या करते तेव्हा त्याला प्रोत्साहित करणाऱ्या व्यक्तीविरोधात पोलीस गुन्हा दाखल करतात. माझ्या प्रकरणात पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा. शेतकरीच जगणार नसेल तर दुसरे कोणी कसे जिवंत राहतील?’, असं निरंजन सिंग म्हणाले. पंजाबच्या फिरोजपूरमधील कुलबीर सिंग या शेतकऱ्याने सोमवारी आत्महत्या केली. हा शेतकरी दिल्लीतील आंदोलनावरून गावी परतला होता. कुलबीर यांच्यावर जवळपास ८ लाख रुपयांचे कर्ज होते. आंदोलनात मृत्यू झालेल्या झालेल्या शेतकर्यांना रविवारी श्रद्धांजली वाहण्यात आली आणि त्यांना शहीद दर्जा देण्यात आला. पंजाबच्या भटिंडा जिल्ह्यातही एका २२ वर्षांच्या शेतकऱ्याने आंदोलनावरून परतल्यानंतर आत्महत्या केली.
संयुक्त किसान मोर्चाने सोमवारपासून पुढील २४ तास रिले हंगर स्ट्राइक सुरू केली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या चर्चेच्या निमंत्रणानंतर शेतकरी नेते मंगळवारी पंजाब आणि राष्ट्रीय शेतकरी नेत्यांची बैठक घेतील. सरकार सतत शेतकऱ्यांना चर्चेचं आवाहन करून मागण्या टाळत आहे. सरकारने तातडीने कृषी कायदे रद्द केले पाहिजेत. उद्या होणाऱ्या शेतकरी नेत्यांच्या बैठकीत सरकारशी चर्चा करायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल. आम्ही येथे ६ महिने बसून आंदोलन करू शकतो, असं शेतकरी नेते सांगत आहेत. अडते आणि शेतकऱ्यांवर प्राप्तिकर विभागाचे छापे टाकले जात आहेत. सरकार जितके अधिक दडपण्याचा प्रयत्न करेल, तितके ते अधिक मजबूत होईल, असं शेतकरी नेते म्हणाले.