सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमेवर असणाऱ्या अथणी तालुक्यातील केंपवाड येथील कारखान्यावर वजनातील काटामारी व तोडीस पैसे घेणे व कारखान्याच्या राखेमुळे द्राक्ष बाग व अन्य पिकांचे नुकसान होत असल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सोमवारी मोर्चा काढण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मोर्चा काढला, साखर आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून अनेक कारखान्याचे तोडकऱ्यांकडून शेतकऱ्यांना पैसे मागत आहेत.
याच लुबाडणुकीमुळे अथणी तालुक्यतील केंपवाड येथे सोमवारी स्वाभिमानी संघटनेचे महेश खराडे व शेतकऱ्यांनी धडक दिली. येथील कारखान्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्या असल्याने याचा जाब येथील अधिकाऱ्यांना विचारण्यात आला. कारखान्याच्या वजनात मोठ्या प्रमाणात काटामारी सुरू असून, ऊस तोडीसाठी ही पाच ते दहा हजारांची मागणी केली जात आहे यासाठी मोर्चाचे आयोजन होते पण कोरोनाचा हवाला देत कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र हद्दीतच आंदोलकांना रोखले.
यावेळी कारखान्याचे शेती अधिकारी बंडू जगताप राजू माने यांनी आंदोलनस्थळी शेतकऱ्यांची भेट घेऊन पैसे मागणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले तसेच कारखान्याची बहुतांशी राख शेतकऱ्यांच्या पिकांना नुकसान पोहचवत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितल्यावर याचीही पर्यायी व्यवस्था करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले. मात्र या मागण्या मान्य न झाल्यासा श्रीमंत पाटील यांच्या सांगलीतील बंगल्यावर मोर्चा काढणार असल्याचे खराडे यांनी सांगितले.