जालना :- उसापेक्षा बांबूची शेती अधिक मिळकत देणारी आणि कमी खर्चाची असून इंधन म्हणून उद्योजकही आता दगडी कोळसाला पर्याय म्हणून प्रायोगिक तत्त्वावर बांबूचा वापर करू लागले आहेत.त्यामुळे बांबूला प्रत्येक जिल्ह्यात बाजारपेठ उपलब्ध होईल.ही बाब विचारात घेता अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांनी आता बांबू शेतीकडे वळून ऊर्जादाता बनावे,असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.
लातुर येथे महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष तथा पर्यावरणपूरक बांबू लागवडीची चळवळ उभारणारे पाशाभाई पटेल यांच्या कार्यालयात बांबू लागवड आणि वापर या विषयावर जालना एमआयडीसीतील उद्योजकांसोबत ना.गडकरी यांची बैठक पार पडली.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी त्यांचा महाराष्ट्र डाळिंब संघाच्यावतीने डाळिंब देऊन सत्कार करण्यात आला आणि डाळिंबातील समस्यांचे निवेदन देण्यात आले. उद्योजकांच्या शिष्टमंडळात घनश्याम गोयल,सुनील अतुल लढ्ढा,अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधक संघाचे सचिव डॉ.सुयोग कुलकर्णी, भारत मंत्री,राजू कोल्हे,शैलेश बजाज आदींचा समावेश होता.
याप्रसंगी ना. गडकरी म्हणाले की,इंधन म्हणून कोळशाच्या वापरामुळे प्रदूषण वाढत असल्याने पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे.ही बाब विचारात घेता कोळशाला पर्याय म्हणून बांबूचा वापर वाढविणे गरजेचे आहे.यामुळे शेतकऱ्यांनाही आर्थिक सुबत्ता प्राप्त होईल.जालना शहरातील काही स्टील कंपन्यांनी पाशाभाई पटेल यांनी केलेल्या आवाहनानुसार कोळशाचा वापर वापर सुरू केला आहे.जालना एमआयडीसी,बल्लारशहा पेपर मिल,परळी थर्मल पॉवर आदी ठिकाणी वापर सुरू झाल्याने लाखो टन बांबूची आवश्यकता भासणार आहे.ही बाब विचारात घेता शेतकऱ्यांनी बांबूची लागवड मोठ्या प्रमाणात करून ऊर्जादाता बनावे,असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान या बैठकीनंतर झालेल्या कार्यक्रमात ना.गडकरी यांनी आपल्या भाषणात जालना शहराचा चारवेळा गौरवपूर्ण उल्लेख केला.