हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या पावसाचे निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे अनेक पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जात आहेत. मात्र अनेकदा पर्यटन करणं हे जीवावर बेतल्याच्या घटना आपण बघितल्या असतील. अशीच एक घटना पुण्यातून समोर आली आहे. भोर तालुक्यात पर्यटनासाठी केलेल्या बाप लेकीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे धक्कादायक घटना घडली आहे. भोर तालुक्याच्या जयतपाड येथे फिरण्यासाठी गेलेल्या या बापलेकीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या मुलीचा मृतदेह सापडला असून तिच्या वडिलांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
भाटघर धरण बॅक वॉटरला असणाऱ्या वेळवंड पांगारी खोऱ्यातील जयतपाड येथे गेलेल्या ऐश्वर्या शिरीष धर्माधिकारी असे तेरा वर्षीय या चिमुकलीचे नाव आहे. तर शिरीष मनोहर धर्माधिकारी असे तिच्या वडिलांचे नाव असून अद्याप त्यांचा मृतदेह शोधण्यामध्ये पोलिसांना यश आलेले नाही. काल रात्री उशिरानंतर पोलिसांनी ही शोध मोहीम थांबवली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, सलग दोन दिवस सुट्टी असल्यामुळे पर्यटक बापलेकीची जोडी कुटुंबासोबत जयपाड येथील मुंगळे रिसॉर्ट येथे गेले होते.
दुपारी ठीक चार वाजता हे दोघेजण आपल्या कुटुंबासोबत भाटघर धरणाचे बॅकवॉटर पाहण्यासाठी आणि बेबी पुल पाहण्यासाठी गेले होते. यादरम्यान त्यांना धरणाच्या जास्त पुढे जाऊ नका तिथे धोका आहे असे फार्मवरील केअर टेकर दत्तात्रय शेडगे यांनी सांगितले होते. मात्र तरीदेखील बेबी फुल पाहण्यासाठी शिरीष धर्माधिकारी पाण्यात उतरले. यानंतर त्यांनी खेळत असणाऱ्या आपल्या मुलीला देखील पाण्यात बोलावून घेतले. यानंतर बराच वेळ हे दोघे या खोल पाण्यात पोहताना दिसले.
परंतु थोड्या वेळानंतर या दोघांना पाण्यातून बाहेर येत आले नाही. त्याचबरोबर हे दोघेजण धरणाच्या आत मध्ये ओढले गेले. धरणाच्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे त्यांना कोणतीच हालचाल करता आले नाही. यामुळे थोड्या वेळानंतर हे दोघे देखील पाण्यात बुडले. ही गोष्ट कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्वरित ऐश्वर्या ला पाण्यातून बाहेर काढले. ज्यावेळी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तसेच शिरीष धर्माधिकारी यांना शोधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही.
या सर्व प्रकरणानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला असता त्यांना देखील शिरीष धर्माधिकारी यांचा मृतदेह कोठेही आढळून आलेला नाही. त्यामुळे आता पाण्याच्या प्रवाहामुळे त्यांचा मृतदेह पुढे गेला असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. काल रात्रीपर्यंत पोलिसांनी सर्व ठिकाणी शिरीष यांचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला मात्र तो कुठेही आढळून आलेला नाही. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी धरणावर जाण्यास पर्यटकांना मनाई केली आहे. तसेच, पर्यटकांनी योग्य काळजी घ्यावी आणि कोणताही जीवाशी हलगर्जीपणा करू नये असे देखील आवाहन केले आहे.