धक्कादायक! पित्यासह सावत्र आईच्या मारहाणीत मुलीचा मृत्यू

0
36
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

बापानेच स्वतःच्या पोटच्या मुलीचा छळ करून, दुसऱ्या पत्नीच्या साथीने अमानुष मारहाण केल्याने मुलीचा मृत्यु झाल्याची दुःखद घटना वाळवा येथे घडली. सुहाना ख्वाजासाहेब मोमीन असे त्या अभागी मुलीचे नाव असुन, सावत्र आई आसमा ख्वाजासाहेब मोमीन हिच्या साथीने ख्वाजासाहेब इस्माईल मोमीन याने त्या मुलीला क्रूर निर्दयीपणे मारहाण केल्यानेच त्या मुलीचा मृत्यु झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. सावत्र आई व बापाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आरोपी ख्वाजासाहेब इस्माईल मोमीन याच्या पहील्या पत्नीची सुहाना ही मुलगी आहे. दोन वर्षापुर्वी सुहानाच्या आईचा मृत्यु झाला, त्यानंतर ख्वाजासाहेब याने आसमाशी विवाह केला व तेव्हापासुन सावत्रपणाची वागणुक देत सुहानाचा छळ पती पत्नींनी सुरू केला होता, घरातील सर्व घरकामे सुहानाकडुन करून घेतली जायची, सुहाना निमुटपणे कामे करीत असे पण तरीही तिला शिवीगाळ करीत अमानुष मारहाण केली जायची, तिची शाळा सुद्धा बापाने बंद केली. लग्नानंतर काही दिवसातच पलुस येथे मदरशामध्ये बापाने तिला पाठवले, दुसरी पत्नी आसमा हिला सात – आठ महीन्यापुर्वी मुलगा झाला, त्यामुळे सुहानाला घरकामसाठी परत वाळवा येथे आणले, सुहाना गावात भंगार गोळा करून बापाला चार पैसे मिळवुन देत असे, घरात धुणी भांडी, पाणी भरणे अशी सर्वच कामे ती करायची.

काल बुधवारच्या रात्री पती पत्नी यांनी लाथाबुक्कयांनी तिला बेदम मारहाण केली, शेजारच्या लोकांनी हस्तक्षेप केला असता माझी मुलगी आहे. मी काहीपण करीन, तुम्हाला काय करायचे ? असा दम त्याने भरला. गुरुवारी सकाळी तो द्राक्षबागेत मजुरीच्या कामावर निघुन गेला, आसमाने अजुन सुहाना का उठली नाही व प्रतिसाद देत नाही म्हटल्यावर पतीला फोन केला, तो आल्यानंतर सुहाना मृत झाल्याचे स्पष्ट झाले, परिसरातील लोक गोळा झाले, स्थानिक नागरीक व शेजारच्या लोकांनी ख्वाजासाबला चांगलाच चोप दिला व पोलीसांना कळवण्यात आले.

आष्टा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक भानुदास निंभोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर ढोरे सहकाऱ्यांसह घटनास्थळी तातडीने दाखल झाले, पोलीस पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह आष्टा उपजिल्हारुग्णालय येथे नेला. आरोपी पती, पत्नीलाही पोलीसांनी अटक केली आहे. अधिक तपास सपोनि विरूपाक्ष कुंभार करीत आहेत. शवविच्छेदनानंतर मृतदेह गावकरी व नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शोकाकुल वातावरणात वाळवा माळ भाग येथे तिच्यावर अंत्यसंस्कार करणेत आले, सदर घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असुन, परिसरातील लोक संताप व्यक्त करीत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here