Tuesday, June 6, 2023

पंतप्रधान मोदी आणि बिल गेट्स यांच्यात ‘कोरोना पे चर्चा’

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मालक आणि सह-संस्थापक बिल गेट्स यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. या दरम्यान पंतप्रधान मोदींनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. पंतप्रधान मोदी आणि बिल गेट्स यांनी कोरोना साथीच्या जागतिक परिणाम या विषयावर पंतप्रधान मोदी आणि बिल गेट्स या दोघांमध्ये सुमारे अर्धा तास देवाणघेवाण केली. वैज्ञानिक इनोव्हेशन आणि संशोधन याचा कोरोना या साथीच्या आजाराशी लढा देण्याच्या दृष्टीने कसा उपयोग करता येईल याबाबतही उभयतांमध्ये चर्चा झाली. तसेच कोरोनाच्या संकटामुळे उत्पन्न झालेले सामाजिक आणि आर्थिक परिणाम कमी करण्यात आणि सर्वांसाठी लसी, चाचणी आणि उपचार उपलब्ध करण्यात भारताची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचं बिल गेट्स यांनी यावेळी म्हटलं.

पंतप्रधान मोदी यांनी चर्चेदरम्यान बिल अण्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील आरोग्यविषयक कामांची प्रशंसा केली. स्वच्छ भारत अभियानाद्वारे स्वच्छतेबाबत पहिल्यापासूनच जागरूक केलं जात होतं. करोना व्हायरसच्या लढाईत ते महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. करोनाविरोधातील लढाईत गेट्स फाऊंडेशन भारतासोबतच जगभरातील निरनिराळ्या भागांमध्ये मदत पोहोचवत आहे, हे खऱ्या अर्थानं उल्लेखनीय आहे, असंही मोदी म्हणाले. जगाच्या हितासाठी भारताच्या क्षमतांचा अधिकाधिक उपयोग कसा करता येईल या संदर्भात त्यांनी बिल गेट्सकडे सूचना मागविल्या.

तसंच यावेळी मोदी यांनी कोरोनाविरोधात भारतानं केलेल्या उपाययोजनांचीही त्यांना माहिती दिली. “भारत आपल्या सर्व नागरिकांच्या मदतीनं कोरोनाविरोधातील ही लढाई कठोरपणे लढत आहे. कोरोनाशी निगडित सर्व माहिती आम्ही सर्वांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झालो आहोत. याचा लाभ जगभरातील अन्य देशही घेऊ शकतात. अशा कठीण परिस्थितीत कोणतेही पूर्वग्रह न ठेवता सर्वांनी एकत्र आलं पाहिजे,” असं मोदी म्हणाले. या साथीच्या काळात भारतातील आरोग्य सेवा कशा मजबूत केल्या जात आहेत हे मोदींनी स्पष्ट केले.

याशिवाय लोकांची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेद औषधे देखील वापरली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. भारतात स्वच्छतेवर जोर देण्यात येत आहे. या सर्व गोष्टींमुळे भारताला कोरोना साथीविरोधात लढा देण्यास बळ मिळाल्याचे त्यांनी सांगितले. भारतातील लोक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत आहेत. यासह, लोकांना लॉकडाउन नियमांसह लोक चेहऱ्यावर मास्क घालत असल्याचे मोदी यांनी चर्चेत सांगितले. यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यात थोडेसे यश मिळाले आहे, असे मोदी म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”