अहमदनगर : हॅलो महाराष्ट्र – आई-वडिलांचा सांभाळ करण्यावरून मुलांमध्ये होणार वाद हि गोष्ट काही नवीन नाही आहे. या वादातून मुले आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवतात तर काही आई-वडील वैतागून घर सोडून जातात. संगमनेर तालुक्यातील चिखली या ठिकाणी अशी एक घटना घडली आहे ज्यामध्ये मुलांनी माणुसकीला काळिमा फासला आहे. वडिलांचा सांभाळ कोणी करायचा, यावरून दोघा भावांमध्ये वाद झाला आणि वादातून त्यांनी आपल्या वडिलांची हत्या केली.
हि घटना संगमनेर तालुक्यात चिखली गावातील वीट भट्टीवर घडली आहे. मृत व्यक्तीचे नाव दशरथ सुखदेव माळी असे आहे. गळा आवळून त्यांचा खून करण्यात आला. पोलिसांनी रामदास दशरथ माळी आणि अमोल दशरथ माळी या दोन्ही भावांना अटक केली आहे. माळी कुटुंब चिंचोली गुरव या गावातील सध्या चिखली येथील एका वीट भट्टीवर कामाला आहे. वडील दशरथ यांचा सांभाळ कोणी करायचा यावरून रामदास आणि अमोल या दोघा भावांमध्ये वाद होता. मंगळवारी यावरून त्यांच्यात पुन्हा एकदा मोठा वाद झाला. या वादात वडील मध्ये आले असताना दोन्ही मुलांनी वडिलांच्या डोक्यात मारहाण केली आणि त्यांची गळा दाबून हत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आरोपी मुलांना अटक केली आहे. सांभाळ करण्याच्या वादातून झालेल्या भांडणात वडिलांचा खून झाल्याची कबुली मुलांनी पोलिसांना दिली आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या कठीण परिस्थितीत अनेकांचे संसार कोलमडले आहेत. अनेकांचा रोजगार बुडाल्याने त्यांना घर चालवणे अवघड झाले होते. यामुळे कौटुंबिक वाद निर्माण झाले आहेत. या वादातून जन्मदात्याचा खून झाल्याच्या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार करत आहेत.