बीड । संपूर्ण देशात कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं वाढत आहे. वृत्तवाहिन्या, स्मार्ट फोन वर येणाऱ्या कोरोना संबंधीच्या बातम्या यातून काही जण सतर्क होत आहेत तर काही भयग्रस्त होत आहेत. लोकांच्या मनात कोरोनाची भीती निर्माण होण्याचं दुसरं कारण म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह झाल्यास सामाजिक बहिष्कार होण्याची भीती. त्यातून अनेकांच्या मनात या कोरोनाविषयीचा भयगंड निर्माण झाला आहे. अशातच कोरोनाला घाबरुन एका 65 वर्षीय वृद्धाने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. बीडच्या पाटोदा तालुक्यातील मंगेवाडी येथे हा खळबळजनक प्रकार घडला आहे. ‘मी कोरोनाच्या भीतीमुळे फाशी घेत आहे.’ , अशी सुसाईड नोट लिहून आसाराम रामकिसन पोटे (वय ६५) या वृद्धाने आत्महत्या केली आहे.
आसाराम पोटे यांना कुठलाही आजार नव्हता. तसेच त्यांनी गेल्या काही दिवसांत कुठेही प्रवास केलेला नव्हता. एवढचं काय तर ते कोणत्याही नवीन व्यक्तीच्या संपर्कातही आले नव्हते. केवळ कोरोनाविषयी बाहेर चर्चा ऐकून आणि सद्य परिस्थिती पाहून त्यांनी आपल्या शेतात एका झाडाला गळफास लावून चक्क आपलं आयुष्य संपवलं. आत्महत्येपूर्वी आसाराम यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमधूनच ही बाब समोर आली आहे.
आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी आसाराम यांनी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली. ‘मी कोरोनाच्या भीतीमुळे फाशी घेत आहे. यामध्ये कोणाचाही दोष नाही’, असं त्यांनी या चिठ्ठीत लिहिलं होतं. त्यामुळे त्यांनी केवळ कोरोनाच्या भीतीपोटी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान या घटनेविषयी शहादेव पोटे यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार, अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदर घटनेचं वृत्त संपूर्ण तालुक्यात पसरलं असून त्यामुळे भीतीचं वातावरणं निर्माण झालं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”