सांगली | मिरज तालुक्यातील तासगाव ते मिरज जाणार्या मार्गावर कवलापूर गावच्या हद्दीत कामावरून घरी निघालेल्या तरुणाला दोघांनी बेदम मारहाण करत कोयत्याचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली. एवढंच नाही तर तरुणाला एटीएम मध्ये नेऊन त्यातील 20 हजार रुपये देखील काढून घेतले. सदरचा लुटमारीचा प्रकार हा शुक्रवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास घडला.
या प्रकरणी रोहन पांडुरंग पाटील याने सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चोरट्यांनी 23 हजार रुपये रोख व सोन्याची अंगठी असा एकूण 48 हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. सांगली शहर विभागात गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार लुटमारीच्या घटना घडत आहेत.
लूटमार आणि चेन स्नॅचिंगच्या घटनेनं शहरात भीतीचे वातावरण पसरलेलं आहे. अशातच आता पुन्हा लुटमारीची घटना घडली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपअधीक्षक अजित टिके व सहायक पोलीस निरीक्षक निशानदार यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. एटीएम मध्ये असलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी अधिकार्यांना केल्या.