Air India च्या विमानात प्रवाशाकडून महिला क्रू मेंबर्सला मारहाण

Air India
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विमानातील प्रवाशांचे क्रू मेंबर्ससोबत गैरवर्तनाचे प्रकार थांबण्याचे काही नाव घेत नाही. यापूर्वीही अशा अनेक बातम्या आपण बघितल्या असतील. आताही एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये एका प्रवाशाने २ महिला क्रू मेंबर्ससोबत गोंधळ घालत, धक्काबुक्की आणि मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रवाशाच्या या कृत्यामुळे विमान टेक ऑफ केल्यानंतर पुन्हा दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आले. विमान उतरल्यानंतर सदर प्रवाशाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की , एअर इंडियाचे विमान सकाळी 6.35 च्या सुमारास लंडनला रवाना झाले. मात्र टेक ऑफ झाल्यानंतर 15 मिनिटांत एका प्रवाशाने विचित्र वर्तन करण्यास सुरुवात केली. त्याला समजावून आणि ताकीद देऊनही त्याने न ऐकता थेट महिला केबिन क्रूशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. यावेळी दुसऱ्या महिला केबिन क्रूने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करताच या प्रवाशाने थेट धक्काबुक्की करत महिला क्रू मेम्बरचे केस ओढण्यास सुरुवात केली.

प्रवाशाच्या या कृत्यामुळे विमान टेक ऑफ केल्यानंतर पुन्हा लगेच दिल्ली विमानतळावर परत उतरवण्यात आले. यानंतर विमान कंपनीने दिल्ली विमानतळावर पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर प्रवाशाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. एअर इंडियानेही या घटनेला दुजोरा दिला आहे. आता हे विमान दुपारनंतर पुन्हा एकदा लंडनला जाणार आहे.

दरम्यान, विमानातील प्रवाशांच्या अशा वर्तनाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. काही महिन्यांपूर्वी एका प्रवाशाने महिला सहप्रवाशावर लघवी केल्याची घटना समोर आली होती. तर, गेल्या महिन्यात लंडनहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील एका प्रवाशाने टॉयलेटमध्ये धूम्रपान करताना पकडले होते. आता तर थेट विमानातच हाणामारी केल्याची घटना समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.