औरंगाबाद। मोंढ्यातील आठ एकर जागेच्या कारणावरून जाफरगेट चौकात दोन गटात वाद झाला. त्यानंतर फिल्मी स्टाईलने तलवारी व लाठ्या-काठ्या घेउन समोरासमोर भिडल्याने आठवडी बाजारात एकच गोंधळ उडाला. मारहाणीत दोन महिलांसह आठ जण जखमी झाले असुन त्यांना उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले आहे. ही घटना रविवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली.
मोंढ्यातील जाफर गेटजवळ कादर शहा अवलीया दर्ग्याची जमीन आहे. या जमिनीचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. मोंढ्यातील चौकाजवळ असलेल्या हॉटेलमध्ये दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जमिनीच्या वादावरून मुश्ताक बिल्डर आणि कटकट गेट येथील अलीम खान यांचे टोळके समोरासमोर भिडले. तलवारी आणि लाठ्या-काठ्याने एकमेंकांवर हल्ला चढवला. त्यामुळे एकच गाेंधळ उडाला आणि रविवारच्या बाजारात एकच धावपळ सुरु झाली. अचानक हल्ला सुरु झाल्याने मुश्ताक बिल्डर यांच्या समर्थकांनी तेथून पळ काढला. मात्र दुसऱ्या गटाने त्यांचा पाठलाग करत त्यांना अडवून हल्ला केला. यात दोन महिलांसह आठजण जखमी झाले. हा हल्ला पूर्वनियोजित असावा, असा संशय आहे.
जागेच्या वादावरून कटकट गेट येथील अलीम खान, सहिर खान, राजु वाघमारे, सिल्लेखाना येथील फिरोज कुरैशी, विनोद खेमजी व त्याच्या दोन मुलांनी पन्नास जणांच्या मदतीने प्राणघातक हल्ला चढवल्याचा आरोप जखमी सैयद अथर यांने क्रांतीचौक पोलीसांसमोर केला. या प्रकरणी विनोद खेमजी यांनी देखील जिन्सी पोलिस ठाण्यात सय्यद मुमताज सय्यद गफूर, सय्यद मुश्ताक सय्यद गफूर, अथहर, शहेबाज आणि त्यांच्यासोबतच्या सात ते आठ जणांविरोधात तक्रार दिली, याप्ररणी रात्री उशिरा पर्यंत दोन्ही पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
ही जागा विवादित असल्याचे सर्वश्रुत आहे. या जागेवरून याआधी देखील तणाव निर्माण झालेला आहे. या बैठकीमध्ये विशेष पोलिस अधिकाऱ्यांची देखील उपस्थिती होती. मात्र त्याची माहिती पोलिस आयुक्तालयातील गुप्तचर यंत्रणेकडे कशी नव्हती, कारण कोरोना काळात अशा प्रकारच्या बैठका घेण्यास मनाई असताना देखील एवढा मोठा जमाव एका हॉटेलमध्ये कसा जमतो यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’