अखेर राज ठाकरेंच्या सभेला परवानगी; ‘या’ 10 अटींवर होणार सभा..?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांबाबत वक्तव्य केल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. यानंतर त्यांनी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेणार असल्याची घोषणा केले होती. मात्र, सभेला पोलीस परवानगी देणार का? असा प्रश्न पडला असताना आता पोलिसांकडून ठाकरेंच्या सभेला परवानगी देण्याबाबत सकारात्मक चर्चा केली जात आहे. मात्र, सभेपूर्वी अटी आणि शर्थी घालण्यात आल्या आहेत.

राज ठाकरे यांची येत्या 1 मे रोजी औरंगाबाद येथे मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. सभेच्या ठिकाणी पोलिसांनीही बंदोबस्ताचा प्लॅन तयार केला आहे.
काल मनसे नेते बाळा नांदगावकरांनी सभा स्थळाची पाहणी केली. यावेळी औरंगाबादेतील मनसेचे इतर नेतेही उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांचीही भेट घेतली. राज ठाकरेंनी प्रक्षोभक भाषण करून नये, यासाठी पोलीस त्यांना नोटिसही बजावण्याची शक्यता आहे. दरम्यान आता राज ठाकरेंच्या जाहीर सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सभेसाठी पोलिसांकडून अटी-शर्थी…

1) सभेला येणार्‍या लोकांनी घोषणा देऊ नयेत, जेणेकरून सामाजिक वातावरण बिघडेल.

2) 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी धर्म, प्रांत, वंश ,जात यावरून वक्तव्य करू नये

3) सामाजिक सलोखा बिघडेल, असं कुठलंही वर्तन करण्यात येऊ नये.

4) लहान मुलं, महिला, वृद्ध यांची सुरक्षितता राहील याची दक्षता घ्यावी

5) सभेच्या ठिकाणी असभ्य वर्तन करू नये.

6) इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घ्यावी.

7) सभेदरम्यान कुठल्याही प्राण्याचा वापर करता येणार नाही.

8) व्यक्ती किंवा समुदायाचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी.

9) सभेपूर्वी आणि सभेनंतर वाहन रॅली किंवा मिरवणूक काढता येणार नाही.

10) वाहन पार्किंगचे नियम पाळावे.