अखेर संभाजीराजेंचे उपोषण मागे; सरकारने मान्य केल्या मागण्या

Sambhaji Raje
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आमरण उपोषण सुरु केले होते. अखेर आज राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी आपले उपोषण मागे घेतले. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी संभाजी राजे यांची आझाद मैदानात भेट घेऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्याचं लेखी उत्तर दिलं. त्यानंतर संभाजीराजेंनी आपले उपोषण मागे घेतले.

संभाजीराजे म्हणाले, आरक्षण हा दीर्घकालीन लढा आहे. मला आनंदानं सांगायचंय की, ज्या मागण्या समोर ठेवल्या होत्या त्यातील काही मागण्या मान्य झाल्या आहेत. मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री वळसे पाटील, अमित देशमुख यांच्यासह इतर नेते इथे आले त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. मलासुद्धा वाचवलंत याबद्दलही आभार मानतो असे संभाजीराजे म्हणाले

राज्यसरकार इतकी तयारी करेल याची मला अपेक्षा नव्हती. मात्र, सरकारने जी तयारी केली ते पाहून भारावलो आहे. मराठा आरक्षणाचा प्रश सर्वोच्च न्यायालयात आहे हे माहित आहे. पण, जेथे जेथे माझी गरज बसेल तेथे राज्य सरकारला पूर्ण सहकार्य करेन मी सुद्धा तुमच्यासोबत असेन, अशी ग्वाही संभाजीराजे यांनी यावेळी दिली.