सांगली | सांगलीतल्या मच्छी मार्केटमध्ये सकाळी अकरानंतर व्यवसायिकांनी दुकाने सुरू ठेवली होती. कर्तत्वात कसूर केल्याप्रकरणी मनपाचे स्वच्छता मुकादम सचिन मद्रासी यांना पदावरून हटविण्याची कारवाई उपायुक्त राहुल रोकडे यांनी केली. तर या प्रभागाचे स्वच्छता निरीक्षक वैभव कुदळे यांनाही ताकीद देण्यात आली.
महापालिका क्षेत्रात लॉकडाऊन सुरू आहे. शहरातील अत्यावश्यक सेवा सकाळी अकरा पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश प्रशासनाचे होते. त्यामध्ये मच्छी, मटण व चिकन व्यवसायिकांचा समावेश होता. बुधवारी 11 वाजल्यानंतर शहरातील मच्छी मार्केट सुरू होत. तसेच त्याठिकाणी पोलीस अधीक्षक व त्यांच्या टीमने जाऊन कारवाई केली होती. सकाळी 11 नंतर मच्छी मार्केट सुरू आहे याबाबत स्थानिक मुकादम आणि स्वच्छता निरीक्षक यांना कल्पना नव्हती.
सदरच्या घटनेची मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी गंभीर दखल घेतली. कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्या भागाचे मुकादम सचिन मद्रासी यांच्यावर मुकादम पदावरून तात्काळ हटवण्याची कारवाई करण्यात आली आहे. तर स्वच्छता निरीक्षक वैभव कुदळे यांना पुन्हा असा प्रकार घडल्यास जबाबदार धरले जाईल अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानुसार उपायुक्त राहुल रोकडे यांनी ही कारवाई केली.