सांगली | पेट्रोल पंपावर कामाला असलेल्या महिला कर्मचाऱ्याने उधार पेट्रोल न दिल्याचा रागातून रेकॉर्डवरील आरोपीने सदर महिलेचा विनयभंग करत तिला जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील संजयनगर येथील खेराडकर पेट्रोल पंपावर घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीनंतर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास संशयित मोटे हा पेट्रोल टाकण्यासाठी खेराडकर पेट्रोल पंपावर आला. त्याच्या दुचाकीमध्ये 60 रुपयांचे पेट्रोल उधार टाका असे तो म्हणाला. यावर पीडितेने उधार पेट्रोल टाकता येत नाही असे सांगितले. त्यानंतर मोटे याने चिडून तुला माहित नाही का तुकाराम मोटे कोण आहे? असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरवात केली.
यावेळी पीडितेने विरोध केला असता तिच्या खांद्यावर असणारी पैशांची बॅग ओढून तो पळून जाऊ लागला त्याला पीडितेने जोरदार प्रतिकार केल्यानंतर त्याने पीडित महिलेचे कपडे फाडून तिचा विनयभंग करण्यास सुरवात केली. यानंतर परिसरातील नागरिक धावत आले. यावेळी मोटे याने दगड आणि फरशीने मारहाण करत पीडित महिलेला जखमी केले.