ओगलेवाडीत जिवंत कासव, मांडूळ विक्रीसाठी घेवून फिरणारे चाैघे वनविभागाच्या ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | कराड तालुक्यात काही लोक जिवंत वन्यजीव मांडूळ व कासव हे विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची खात्रीपूर्वक गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे संशयास्पद चाैघांची झडती घेतली असता त्यांच्या जवळ एका पिशवीत जिवंत कासव व एका पिशवीत एक जिवंत मांडूळ मिळून आले आहे. त्यामुळे वनविभागाच्या फिरत्या पथकाने चारजणांना ताब्यात घेतले असून त्याच्याकडून दोन दुचाकी, चार मोबाईल, दोन वन्यप्राणी असा मुद्देमाल जप्त केला आहे.

वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी, गोपनीय माहिती मिळाल्याने वनविभाग संशयितांचा शोध घेत होते. राजमाची (ओगलेवाडी) येथे सांज सावली हॉटेलमध्ये दोन दुचाकीवरून आलेले चारजण जेवण करीत बसले होते. त्यांच्या हालचाली संशयास्पद होत्या. त्यामुळे वनविभागाचे सहाय्य वनसंरक्षक महेश झांजुर्णे, मानद वन्यजीव रक्षक तथा वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो सदस्य रोहन भाटे, वनरक्षक विजय भोसले यांच्या फिरत्या पथकाने त्यांची झडती घेतली. सदरील संशयिताकडे कासव हे इंडियन सॉफ्ट शेल्ड टरटल(कासव) व कॉमन सॅनड बोआ (मांडूळ) हे प्राणी आढळून आले.

वनविभागाने रोहित साधु साठे (वय- 20), प्रशांत रामचंद्र रसाळ(वय- 20), अविनाश आप्पा खुडे (वय 21, तिघेही रा. अकलूज, ता.माळशिरस जि. सोलापूर) व सुनील तानाजी सावंत (वय- 28, रा. दिवड, ता. माण, जि. सातारा) असे ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. तर दुचाकी गाडी (MH- 12- DP- 3691) स्प्लेनडर व एक विना नंबरची कावास्की बजाज बॉक्सर, 4 मोबाईल संच, दोन जिवंत वन्यजीव प्राणी हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक महेश झांजुर्णे , मानद वन्यजीव रक्षक तथा वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो सदस्य रोहन भाटे, वनपाल – ए. पी. सावखंडे, बाबुराव कदम, वनरक्षक उत्तम पांढरे, विजय भोसले, रमेश जाधवर, अरुण सोलंकी, वनपाल कोळे, सचिन खंडागळे, श्रीकांत चव्हाण, हणमंत मिठारे, सुनीता जादव, दीपाली अवघड, शीतल पाटील हे वनकर्मचारी कारवाईत सहभागी होते.

Leave a Comment