थोडी तरी लाज शिल्लक असेल तर राजीनामा द्यावा; अतुल भातखळकरांची आरोग्यमंत्री टोपेंवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्यावतीने येत्या २४ ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्याचा व त्यासाठी दोन दोन जिल्ह्यात केंद्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावरून आता भाजपमधील नेत्यांकडून आरोग्यमंत्री राजेश टोपेंवर टीका केली जात आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आरोग्यमंत्री टोपेंवर निशाणा साधला आहे. एक दिवशी दोन परीक्षा, दोन सेंटर, दोन्ही काही मैलावर. थोडी तरी लाज शिल्लक असेल तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा.नसेल तर मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, अशी मागणी करीत भातखळकरांनी टीका केली आहे.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाउंटद्वारे आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या वेळावरून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ट्विटमध्ये भातखळकरांनी म्हंटले आहे की, एक दिवशी दोन परीक्षा, दोन सेंटर, दोन्ही काही मैलावर आहे. ‘टोपे साहेब आता विद्यार्थ्यांसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था कराच’- आरोग्य विभागाच्या भरती परिक्षेत दुसऱ्यांदा गोंधळ झालाय. थोडी तरी लाज शिल्लक असेल तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा.नसेल तर मुख्यमंत्र्यांनी घ्यावा.

राज्याच्या आरोग्य विभागाच्या भरतीचा गोंधळ अद्यापही मिटलेला नाही. एकदा ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्यानं राज्यातील लाखो परीक्षार्थींनी आक्रोश केला. मात्र, आता दुसऱ्यांदा परीक्षा घेताना देखील या तरुणांना मनस्तापच सहन करायला लागत असल्याचं दिसत आहे. आता या विषयांत स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालावे, शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून या परीक्षा घेण्यात याव्या व आपल्या निष्क्रियतेमुळे लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा वेठीस धरण्याचे काम करणाऱ्या व केवळ खोट्या वल्गना करण्यात धन्यता मानणाऱ्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची तात्काळ मंत्री पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी आमदार भातखळकर यांनी केली आहे.

You might also like