विनापरवाना लाकूड 2 ट्रक मिल मधून वनविभागाने घेतले ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
विनापरवाना जळाऊ लाकूड वहातूक करून ते खाली उतरवून घेत असताना सातारा वनविभागाने कारवाई केली. दोन ट्रकसह सुमारे 26 घनमीटर जळाऊ लाकूड जप्त केले. गुरुवारी दुपारी बोरगाव (ता. सातारा) येथील के पॉवर अँड पेपर मिल परिसरात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी संतोष गणपत चव्हाण व सुनील श्रीराम जाधव (दोघे रा. ओमळी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) या दोन वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येथील के पॉवर अँड पेपर मिल परिसरात दोन (ट्रक क्र. एमएच- 11 एएल- 0736) व (एमएच- 08- एच- 0887) मधील जळाऊ लाकूड खाली उतरविला जात असल्याची माहिती सातारा वनपरिक्षेत्राचे अधिकारी निवृत्ती चव्हाण यांना मिळाली होती. या माहितीच्या आधाराने वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी निवृत्ती चव्हाण, वनपाल कुशल पावरा, वनरक्षक राज मोसलगी, महेश सोनवले व वाहनचालक संतोष दळवी यांनी तेथे कारवाई केली. यावेळी त्यांना पेपरमिल परिसरात दोन ट्रक मधून जळाऊ लाकूड उतरवून घेत असल्याचे आढळले. या लाकूड मालाबाबत वैध वहातुक पास परवान्याची दोन्ही ट्रक चालकांकडे मागणी केली असता त्यांच्याजवळ वैध वहातुक परवाना पास नसल्याचे आढळून आले.

वनविभागाने तात्काळ दोन्ही ट्रक व त्यामधील सुमारे 26 घनमीटर जळाऊ लाकूड जप्त केले. दोन्ही वाहनचालकांविरोधात भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41(2) ब अन्वये वनगुन्हा नोंद करण्यात आला. सदरची कारवाई सातारा उपवनसंरक्षक (प्रा.) महादेव मोहिते व सहाय्यक वनसंरक्षक (वनी.) सुधीर सोनवले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी निवृती गो. चव्हाण, वनपाल सातारा कुशल पावरा, वनरक्षक राज मोसलगी, महेश सोनावले, वाहनचालक संतोष दळवी यांनी केली.