हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारला शह देण्यासाठी एकत्र आलेल्या देशभरातील 28 विरोधी पक्षांच्या इंडिया (INDIA Alliance) आघाडीची मुंबईत बैठक सुरु आहे. या बैठकीत इंडिया आघाडी कडून समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. एकूण १३ सदस्यांचा या समिती मध्ये समावेश करण्यात आला असून महाराष्ट्रातील २ नेत्यांचा यामध्ये समावेश आहे. तसेच संप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत देशात इंडिया आघाडीची भव्य अशी सभाही होऊ शकते.
समन्वय समिती मध्ये कोणकोणत्या नेत्यांचा समावेश –
१३ सदस्यांच्या समन्वय समितीत एमके स्टालिन, तेजस्वी यादव, शरद पवार, लल्लन सिंग, जावेद अली खान, केसी वेणूगोपाल, ओमर अब्दुल्ला, हेमंत सोरेन, डी.राजा, महेबूबा मुफ्ती, अभिषेक बॅनर्जी, राघव चढ्ढा या नेत्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून संजय राऊत आणि शरद पवार या २ नेत्यांचा समावेश असल्याने महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.
आजच्या या इंडिया आघाडीच्या बैठकीत संयोजकपद आणि लागो याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. दिल्लीत इंडिया आघाडीच्या लागो चे अनावरण होईल असं सांगण्यात येत आहे. आज दुपारी साडेतीन वाजता या आघाडीची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत बैठकीत नेमकी कोणकोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली याबाबत अधिकृत तपशील समोर येईल.