हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे, पंचनाम्यांच्या भानगडीत न पडता राज्य सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत जाहीर करावी. केंद्र सरकार राज्याला सहाय्य करेलच. पण राज्य सरकारनं टोलवाटोलवी न करता आधी मदतीची घोषणा करावी, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. केंद्राची वाट न पाहता राज्य सरकारनं मदत द्यावी. सोयीस्कर भूमिका घेऊ नये. सगळंच केंद्रावर ढकलायचं असेल, तर मग राज्य सरकार कशासाठी आहे, असा सवाल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला केला. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागांची पाहणी करण्यासाठी बारामतीत आले असताना फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
राज्यातील बंद मंदिरावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून काही प्रश्न विचारले होते. यावर फडणवीस म्हणाले, राज्यपालांचे एखादे वाक्य आणि त्यावरील विवाद यावर वाद करत बसण्याची ही वेळ नाही. सरकारने पहिल्यांदा शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे. शेतकरी एवढ्या गंभीर परिस्थितीमध्ये आहे. तुमचे राज्यपालांसोबत जे काही मतभेद असतील ते चालत राहतील. आता तो विषय नसून शेतकऱ्याला काय मदत मिळणार हे महत्वाचं आहे, असं फडणवीस म्हणाले.
शरद पवारांना सरकारला पाठिशी घालावं लागत आहे. या सरकारला पाठिशी घालणं एवढचं काम शरद पवारांकडे आहे. राज्य सरकारविरोधात लोकांमध्ये असंतोष आहे. आमचा दौरा घोषित होईपर्यंत कोणताही पालकमंत्री जिल्ह्याकडे फिरकला नव्हता. आम्ही दौरा करायला लागल्यामुळे सगळेजण आता घराबाहेर पडले आहेत,’ असं फडणवीस म्हणाले.
तुम्ही मुख्यमंत्री म्हणून काम करा आम्ही सदस्य म्हणून बाहेर जाऊन काम करु असं पवारांनी म्हटल्याचं सांगत यासंदर्भातील प्रतिक्रिया फडणवीस यांना पत्रकारांनी विचारली. “पवारांना या सरकारचा बचाव करावा लागत आहे. या सरकारचा नाकर्तेपणा बाहेर येतोय. त्यामुळे असंतोष तयार झालेला आहे. त्यामुळे रोज या सरकारचा बचाव करणं एवढचं काम पवारांकडे आहे,” असं फडणवीस म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’