नवी दिल्ली । ‘कॅप्टन कूल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि भारतीय क्रिकेट संघाला एका वेगळ्या उंचीवर ऩेऊन ठेवणाऱ्या Mahendra Singh Dhoni महेंद्र सिंह धोनीनं अखेर आपल्या निवृत्तीची घोषणा केली. धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वाला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आणि पाहता पाहता सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांनी क्रिकेटमधील त्याच्या योगदानासाठी त्याचे आभार मानले. प्रत्येकजण या अष्टपैलू खेळाडूविषयी आणि तितक्याच दिलखुलास व्यक्तीविषयी बोलत होतं. संघातील खेळाडूही यात मागे राहिले नाहीत
अनेक रोमांचक सामन्यात धोनीचा पार्टनर राहिलेल्या युवराज सिंग म्हणजेच युवीनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये धोनीसोबतच्या काही खास आठवणींना उजाळा दिला. ‘अद्वितीय कारकिर्दीसाठी तुझं अभिनंदन माही. देशासाठी तुझ्यसमवेत २००७ आणि २०११ चा विश्वचषक उचलण्याचा आणि खेळपट्टीवर तुझ्यासोबतच्या भागीदारीचा आनंद काही औरच. तुझ्या भवितव्यासाठी माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा…..’, असं कॅप्शन लिहित युवराजनं त्याच्या ऑनफिल्ड साथीदाराच्या पाठीवर आपलेपणाची थाप मारली.
https://www.instagram.com/p/CD9F_HmDSKU/?utm_source=ig_web_copy_link
अनेकदा धोनीसोबत खेळपट्टीवर विरोधी संघापुढं आव्हान उभं करणाऱ्या आणि मुख्यत्त्वे २०११ च्या क्रिकेट विश्वचषकात त्या अखेरच्या षटकारावेळी युवराज सिंग त्याच्यासोबत खेळपट्टीवर तळ ठोकून होता. धोनीसोबतच्या काही क्षणांची छायाचित्र सुरेख पद्धतीनं गुंफलेल्या या व्हिडिओमध्ये खऱ्या अर्थानं भारतीय क्रिकेट संघाचा एक सुवर्णकाळ पाहायला मिळत आहे.
जवळपास १० वर्षांहून अधिक काळ, धोनी आणि युवराजनं भारतीय क्रिकेट संघाच्या फलंदाजीची मधली फळी सांभाळली. अनेक अटीतटीच्या सामन्यांमध्ये अगदी अखेरच्या क्षणी या दोघांनी संघाला विजय मिळवून दिला. भागीदारीनं या दोघांनीही ३००० धावा केल्या. या दोन्ही खेळाडूंमध्ये असणारं नातं आणि त्यांचा खेळ पाहणं क्रीडारसिकांसाठी खऱ्या अर्थानं परवणीच.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”