हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कथित 100 कोटी खंडणी वसुलीप्रकरणी आरोप असलेल्या राष्ट्रवादीचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज आर्थर रोड तुरुंगातुन सुटका झाली. देशमुख तब्बल 1 वर्ष 1 महिना आणि 26 दिवसांनी तुरुंगातून बाहेर आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. अनिल देशमुख यांच्या जामिनावरील स्थगितीला मुदतवाढ देण्याची सीबीआयने याचिका दाखल केली होती. यावेळी सीबीआयने दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने काल फेटाळून लावली. त्यानंतर आज देशमुख यांच्या वकिलांनी पत्र जेल प्रशासनास दिले. त्यानंतर आणील देशमुख यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली.
परमबीर सिंह यांनी लेटरबॉम्ब टाकून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दरमहा 100 कोटी वसुलीचा आरोप केला होता. व्यावयासियांकडून दरमहा 100 कोटी वसुली करण्याचे आदेश अनिल देशमुखांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले होते, असा आरोप या लेटर बॉम्बमधून करण्यात आला होता. या पत्राची दखल घेत 1 नोव्हेंबर 2021 रोजी ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीअंती त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल झाला.
Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh is released from Arthur road jail in Mumbai. pic.twitter.com/a3OKktDrq8
— ANI (@ANI) December 28, 2022
नेमकं प्रकरण काय?
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात अनिल देशमुख यांनी सचिन वझेकडे गृहमंत्री असताना दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी सीबीआयने अनिल देशमुख यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला होता. सीबीआय एफआयआरच्या आधारे ईडीने कारवाई केली आहे. देशमुख हे महाराष्ट्राचे गृहमंत्री असताना त्यांनी बार आणि रेस्टॉरंटच्या मालकांकडून 4.7 कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. ही रक्कम डिसेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत जप्त करण्यात आली असून ही रक्कम मुंबई पोलिसांचे सहाय्यक निरीक्षक सचिन वझेमार्फत वसूल करण्यात आली होती.
ईडीनुसार, या रकमेपैकी 4.18 कोटी रुपये दिल्लीतील 4 वेगवेगळ्या शेल कंपन्यांमध्ये जमा करण्यात आले होते. या कंपन्यांनी ही रक्कम श्री साई एज्युकेशनल इन्स्टिट्यूट नावाच्या ट्रस्टला दिली. हा ट्रस्ट अनिल देशमुख आणि त्यांचे कुटुंब चालवतात. म्हणजेच वसुलीचा पैसा शेल कंपन्यांच्या माध्यमातून देशमुख यांच्या ट्रस्टमध्ये वापरला गेला.